राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढतेय. कोरोनाग्रस्त रूग्णांच्या उपचारांसाठी रेमेडिसीवीर इंजेक्शन वापरण्यात येतं. मात्र सध्या राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा तसंच रेमेडिसीवीर इंजेक्शन रूग्णांना मिळण्यास फार त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान याच मुद्दयावरून अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नागरिकांना आवाहन केलंय.
ADVERTISEMENT
यासंदर्भात अमोल कोल्हे यांनी ट्विट केलंय. ते म्हणतात, “रेमेडिसिवीरच्या वापराबाबत कोविड टास्क फोर्सने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांचा व्हिडिओ केल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यात एक महत्वाची प्रतिक्रिया अशी होती की, डॉक्टरांनी हे इंजेक्शन तर लिहून दिलंय पण ते आता मिळत नाही. या परिस्थितीत काय करावं? शासन व प्रशासन रेमडिसिवीरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. परंतु सातत्याने वाढती रुग्णसंख्येमुळे याला मर्यादा येत आहेत. हा पुरवठा सुरळीत होईपर्यंत कोविड टास्क फोर्सने सुचविलेली औषधे रुग्णांना देता येतील.”
ते पुढे म्हणतात, “रेमेडिसिवीर हे जीवनरक्षक औषध नाही. शरीरातील विषाणूंचा भार कमी करण्यासाठी ते दिलं जातं. परंतु जर ते उपलब्ध झालं नाही तर कोविड टास्क फोर्सने पर्यायी औषध फेव्हीपॅरावीर सुचवलं आहे. ते रुग्णाला द्यावं.”
“पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, रेमेडिसिवीर हे जीवनरक्षक औषध नाही. त्यामुळे ते रुग्णांना देताना डॉक्टरांनी पुरेशी काळजी घ्यावी. यासोबतच उपलब्ध साठा काळजीपूर्वक वापरुन गरज असणाऱ्या रुग्णांनाच हे इंजेक्शन दिलं जावं अशी माझी नम्र विनंती आहे.”असंही ते म्हणालेत.
ADVERTISEMENT