अमरावतीच्या वर्धा नदीत बोट बुडून ११ जण बुडाल्याची धक्कादायक दुर्घटना काही दिवसांपूर्वी घडली. या अपघातानंतर घटनास्थळी NDRF आणि SDRF च्या पथकाचं बचावकार्य सुरुच आहे. १४ सप्टेंबरला ही दुर्घटना घडल्यानंतर ३ जणांचे मृतदेह हाती लागले होते. यानंतर आज दोन दिवसांनी ६ जणांचे मृतदेह शोधण्यात NDRF ला यश मिळालं आहे.
ADVERTISEMENT
ही दुर्घटना घडण्याआधीचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. ज्यात नदीच्या पाण्याचा प्रवाह किती मोठा होता याचा अंदाज येत आहे. याच पाण्याच्या प्रवाहासमोर बोटीचं संतुलन बिघडल्यामुळे बोट बुडाल्याचं बोललं जातंय.
तब्बल दोन दिवसांच्या बचावकार्यानंतर NDRF ला ६ जणांचा मृतदेह शोधण्यात यश आलं आहे. अद्याप दोन लहान मुलींचा शोध सुरु असल्याची माहिती स्थानिक NDRF अधिकाऱ्याने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार १४ सप्टेंबरला अमरावतीमधील एकाच कुटुंबातले ११ जण गाडेगाव येथील मटरे कुटुंबीयांकडे दशक्रिया विधीसाठी आले होते. सोमवारी संध्याकाळी दशक्रिया विधी झाला. त्यानंतर ही लोकं सकाळी १० वाजण्याच्या सुमारास वरूडकडे फिरायला गेले. त्यावेळी महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून होडीने जात असताना होडी उलटली आणि ११ जण बुडाली.
अमरावती आणि नागपूरच्या मधोमध वर्धा नदी आहे. याच ठिकाणी झुंज नावाचं एक मोठं तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी अनेक भाविक भक्त येतात. या घटनेची माहिती मिळताच NDRF ने स्थानिक यंत्रणांच्या सहाय्याने बचावकार्य सुरु केलं होतं. परंतू पहिल्या दिवशी तिघांचे मृतदेह हाती लागले होते. यानंतर दोन दिवसांनी ६ जणांचे मृतदेह शोधण्यात बचावपथकाला यश आलं.
ADVERTISEMENT