मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यानंतर मुंबई पोलीस दलातील एक अधिकारी सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी असं या अधिकाऱ्याचं नाव असून, मुंबई पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दुसरीकडे त्रिपाठी यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.
ADVERTISEMENT
काय आहे अंगडिया प्रकरण?
रोख रक्कम, सोनं-चांदी यासह हिरे आदी गोष्टी एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणाऱ्या मुंबईतील अंगडिया असोसिएशनने मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पोलीस अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी करत त्रास दिला जात असल्याची तक्रार केली होती. खंडणी मागितली जात असल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर दक्षिण मुंबई विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी १८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला होता. सुरुवातीला एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल गेला होता.
त्रिपाठी कसे अडकले?
या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांवर अटक करण्यात आली. यात पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांच्यासह पोलीस अधिकारी नितीन कदम आणि समाधान जमदाडे यांचा समावेश आहे. दरम्यान, या खंडणीच्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा विभागाकडे देण्यात आला. पोलीस तपासातून पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचं नावं समोर आलं.
संजय पांडे यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार घेण्याच्या आधीपासूनच सौरभ त्रिपाठी सुट्टीवर आहेत. ओम वंगाटे यांना कोठडी वाढवून घेण्यासाठी न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्याचवेळी पोलिसांनी आपल्या अर्जात पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना फरार घोषित केलं.
सौरभ त्रिपाठी यांचं नाव समोर आल्यानंतर त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यातून हटवण्यात आलं. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून सौरभ त्रिपाठी फरार आहेत. या खंडणीप्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
दरम्यान, पोलिसांकडून शोध सुरू असतानाच शनिवारी (१९ मार्च) सौरभ त्रिपाठी यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली. सौरभ त्रिपाठी यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात याचिका दाखल केलेली असून, त्यांच्या याचिकेवर सोमवारी म्हणजेच २३ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
ADVERTISEMENT