मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणात NIA ने मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांनी शनिवारी रात्री अटक केली. या प्रकरणी आता कोर्टाने सचिन वाझे यांना २५ मार्चपर्यंत NIA च्या कस्टडीत दिलं आहे. सचिन वाझे यांना अटक करण्यापूर्वी NIA च्या अधिकाऱ्यांनी १३ तास त्यांची चौकशी केली.
ADVERTISEMENT
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा तपास करण्यासाठी सचिन वाझे पहिल्यांदा घटनास्थळी पोहचले होते. यानंतर मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे यांच्या सहभागावरुन विरोधीपक्षांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरलं होतं. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने अंबानीच्या घराबाहेरील गाडीचा तपास NIA कडे सोपवला होता.
वाझे हे काल सकाळी एनआयए कार्यालयात ११ वाजता पोहचले होते. त्यानंतर एटीएस आणि क्राईम ब्रांचचे काही अधिकारी देखील तिथे पोहचले होते. यावेळी एनआयएकडून सचिन वाझे यांना याप्रकरणी बरेच प्रश्न विचारण्यात आले. अखेर मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी संशयित कार सापडली होती त्याप्रकरणी वाझे यांना अटक करण्यात आली.
२५ फेब्रुवारी रोजी मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या मुंबईतील निवासस्थानाच्या बाहेर स्कॉर्पिओ कार आणि त्यामध्ये जिलेटीनच्या कांड्यांसह एक धमकीचं पत्र सापडलं होतं. ज्याचा तपास सुरुवातीला क्राईम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझे यांच्याकडेच होता.
अखेर हा संपूर्ण तपास एनआयएने आपल्या ताब्यात घेतला. या सगळ्या प्रकरात सगळ्यात महत्त्वाची आणि आश्चर्यकारक बाब म्हणजे या प्रकरणाचा तपास अधिकारीच आता आरोपी ठरला असून त्याला अटक देखील करण्यात आली आहे.
कोणत्या कलमांखाली वाझेंना अटक करण्यात आली आहे?
सचिन वाझे यांना 286, 465, 473, 560 (2), 120 बी अंतर्गत आयपीसी आणि 4(A) (B) (I) स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अँटेलिया येथील स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्यात सचिन वाझे यांची भूमिका आणि सहभाग असल्याचा आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे.
वाझेंच्या अटकेनंतर किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया:
दरम्यान सचिन वाझे यांना अटक करण्यात आल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तात्काळ आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘सचिन वाझेंची अटक झाली आहे. पण त्यांना वाचवणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनाही जाब तर द्यावाच लागणार आहे. आता शिवसेनेचे प्रवक्ता ओसामा सचिन वाझेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता काय सांगणार आहेत? अजून तर काय-काय बाहेर येणार ते देखील पाहायला हवं.’ असं म्हणत सोमय्या यांनी शिवसेनेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
सचिन वाझे हे ओसामा बिन लादेनच असं का वाटतंय भाजपला?: मुख्यमंत्री
वाझेंना कोर्टाने अंतरिम जामीन नाकारला:
मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेंना अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. सचिन वाझे यांची चौकशी एटीएस मार्फत करण्यात आली. त्यानंतर अटकपूर्व जामिनासाठीही सचिन वाझे यांनी अर्ज केला. मात्र या अर्जावर १९ मार्चला सुनावणी होणार आहे.
कोर्टाने सध्या त्यांना अंतरिम सुरक्षा देण्यास नकार दिला आहे. कोर्टात झालेल्या युक्तीवादा दरम्यान सचिन वाझे हजर नव्हते. मात्र सचिन वाझे यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी असा युक्तीवाद केला की मनसुख हिरेन यांची पत्नी विमला हिरेन यांनी फक्त संशय व्यक्त केला आहे.
तसंच या प्रकरणात कोणताही प्रथमदर्शनी पुरावा या प्रकरणात सचिन वाझेंच्या विरोधात नाही. एवढंच नाही तर एटीएस सचिन वाझेंना त्रास देतं आहे. मनसुख हिरेन प्रकरणाशी सचिन वाझेंचा काहीही संबंध नाही असंही वाझे यांच्या वकिलांनी सांगितलं. मात्र अंतरिम सुरक्षा देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.
Antilia Case- सचिन वाझे NIA पुढे जबाब नोंदवण्यासाठी हजर
जाणून घ्या संपूर्ण प्रकरण:
25 फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. सुरूवातीला ही कार कुणाची आहे ? ही कार कुणी ठेवली? या सगळ्याची उकल झाली नव्हती. अजूनही ही कार नेमकी कुणी ठेवली ते समजू शकलेलं नाही. मात्र ही स्कॉर्पिओ कार मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती.
मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्चला सापडला. या प्रकरणात नाव समोर आलं ते सचिन वाझे यांचं. आज अँटेलिया प्रकरणात सचिन वाझे हे NIA पुढे जबाब नोंदवण्यासाठी हजर झाले आहेत.
अँटेलिया स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांचं नाव समोर आलं देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे. देवेंद्र फडणवीस यांनी अँटेलिया प्रकरणाचा उल्लेख विधानसभेत केला तेव्हा त्यावेळी तिथे सर्वात आधी सचिन वाझे कसे काय पोहचले हा प्रश्न उपस्थित केला होता.
एवढंच नाही तर मनसुख हिरेन यांना सुरक्षा पुरवली पाहिजे अशीही मागणी फडणवीस यांनी केली होती. ५ मार्चला त्यांनी अधिवेशनात ही मागणी केली आणि त्यानंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाल्याची बातमी आली. ज्यानंतर हे प्रकरण आणखी गंभीर झालं.
मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या जबाबाचा काही भाग देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत वाचून दाखवला. “माझ्या पतीची हत्या झाली आहे. ते बुडून मरू शकत नाहीत कारण ते उत्तम स्वीमर होते. त्यांची हत्या सचिन वाझे यांनी केली असा मला संशय आहे” असा विमला हिरेन यांचा कबुली जबाब आहे.
या कबुली जबाबावरून विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेंना पदावरून हटवण्याची मागणी केली. दोन ते तीन दिवस हा मुद्दा विधानसभेत गाजला. अँटेलिया प्रकरण हे NIA कडे तर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण हे ATS कडे सोपवण्यात आलं. या दोन्ही तपास संस्था या प्रकरणांचा तपास करत आहेत. आता सचिन वाझे हे NIA पुढे जबाब नोंदवण्यासाठी हजर झाले आहेत. ATS पुढे त्यांनी आधीच त्यांचा जबाब नोंदवला आहे.
ADVERTISEMENT