राजस्थानमधील ताज्या राजकीय घडामोडींनंतर काँग्रेस हायकमांड मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. अशोक गहलोत पक्षाध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतात, असं वृत्त समोर येत आहे. सोमवारी दिल्लीतील 10 जनपथवर बैठक सुरू होण्यापूर्वीच मोठी माहिती समोर आली आहे. केरळपासून जयपूरपर्यंत सर्व काँग्रेसच्या नेत्यांचा सूर एकच आहे.
ADVERTISEMENT
‘अशोक गहलोत काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत’, असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. इतर नेते 30 सप्टेंबरपूर्वी अध्यक्षपदाच्या निवडणुकाचा अर्ज भरतील. आता मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खर्गे, दिग्विजय सिंह, केसी वेणुगोपाल हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. सीडब्ल्यूसी सदस्य आणि पक्षाच्या एका नेत्याने असेही सांगितले की गहलोत ज्या पद्धतीने वागले ते पक्ष नेतृत्वाला आवडेले नाही. यामुळे वरिष्ठ नेतृत्वाची अडचण झाली आहे.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक
राजस्थानमधील घडामोडींनंतर पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावले आहे. या नेत्यांसोबत राजस्थानातील घडामोडींसह अध्यक्ष निवडीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केके वेणुगोपाल 10 जनपथवर पोहोचले आहेत. राजस्थानचे निरीक्षक अजय माकन आणि मल्लिकार्जुन खरगे यांनीही बैठकीला हजेरी लावली आहे. राजस्थान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामेश्वर दुडी हेही 10 जनपथवर आले आहेत. माजी खासदार कमलनाथ यांनाही दिल्लीत बोलावण्यात आले आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक: 30 सप्टेंबरला चित्र स्पष्ट होईल
काँग्रेस नेते के मुरलीधरन म्हणाले ”काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबतचे चित्र 30 सप्टेंबरलाच स्पष्ट होईल. त्याच दिवशी पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण-कोण लढणार हे कळेल. 29 सप्टेंबर रोजी दुपारी केरळमध्ये भारत जोडो यात्रेचा समारोप होणार आहे. सर्व नेत्यांशी चर्चा सुरू आहे. कोणताही निष्कर्ष निघाला नसून तीन दिवसांत सर्व प्रकरणे निकाली काढली जातील.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गांधी परिवार हस्तक्षेप करणार नाही. सोनिया मॅडम आणि राहुल जी यांनी आधीच जाहीर केले आहे की ते अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करणार नाहीत.” राजस्थानचे प्रकरण एक-दोन दिवसांत निकाली निघेल. त्याच वेळी, शशी थरूर यांनी आधीच घोषणा केली होती, परंतु तीन दिवसांत आणखी काही लोकही अर्ज दाखल करतील आणि 30 सप्टेंबरपर्यंत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल असंही मुरलीधरन म्हणाले.
अशोक गहलोत गटाचे बंड
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, पक्षाने अजय माकन आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना राजस्थानमधील नवीन मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत सल्लामसलत करण्यासाठी जयपूरला पाठवले होते. पण, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वीच गहलोत गटाने हायकमांडविरोधात बंड केले आणि 82 आमदारांनी सामूहिक राजीनामे देण्याचा दावा केला. नंतर हे राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आले. ही घटना पक्ष नेतृत्वाच्या विरोधात असल्याचे मानले जात आहे.
ADVERTISEMENT