मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार अनिवार्य असलेल्या बँक आणि ग्राहक यांच्यातील लॉकर ॲग्रिमेंटच्या स्टॅम्प खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरु आहे. मुंबईसह राज्यात आणि देशाच्या अनेक भागांमध्ये स्टॅम्प खरेदीसाठी ग्राहकांनी रांगा लावल्या आहेत. या अग्रिमेंटची मुदत ३१ डिसेंबर २०२२ होती. मात्र हे अॅग्रिमेंट करण्याचं काम अद्यापही सुरुच असल्याची माहिती मिळत आहे.
ADVERTISEMENT
रिझर्व्ह बँकेने १ जानेवारी २०२३ पासून लॉकरच्या नियमात काही बदल केले आहेत. यानुसार बँक आणि ग्राहक यांच्या मॉडेल लॉकर अॅग्रिमेंट करण्यात येत आहे. हे ॲग्रिमेंट बँकानुसार वेगवेगळं असणार नाही, तर ‘आयबीए’ अर्थात इंडियन बँक असोसिएशनच्या मसुद्यानुसार सर्व बँकांसाठी एकच मसुदा राहणार आहे.
त्यामुळे लॉकर संदर्भात बँक स्वतः काही निर्णय घेऊ शकणार नसल्याचं सांगितलं जात आहे. या अॅग्रिमेंटमधील अटी क्लिष्ट नसतील. कोणत्याही बँकेत नव्याने लॉकर घेणाऱ्या सर्व ग्राहकांना आता या मसुद्यानुसार लॉकर ॲग्रीमेंट करावे लागणार आहे. तसंच आधीपासून लॉकर असलेल्या ग्राहकांना ३१ डिसेंबरपर्यंत नवे करार करून घेण्याच्या सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या.
नव्या लॉकर करारातील मुद्दे
-
नवा लॉकर ग्राहकाला देण्यापूर्वी बँकेला संबंधित ग्राहकाकडून एक करार करावा लागणार आहे. हा करार बँकेच्या शिक्क्यासह असेल.
-
या करारावर बँकेतर्फे अधिकारी व्यक्तीची आणि ग्राहकाची अशा दोघांच्या सह्या असतील.
-
या करारात लॉकर घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकाचे अधिकार आणि कर्तव्ये लिहिलेली असावीत.
-
लॉकर कराराची मूळ प्रत लॉकर प्रत्यक्षात असलेल्या बँकेच्या शाखेकडे राहील.
लॉकरधारकांसाठी आणखी एक दिलासा देणारा नियम म्हणजे, बँकेच्या इमारतीच नैसर्गिक किंवा अन्य कारणानं पडझड होऊन, त्यात लॉकरमधील चीजवस्तूंचे नुकसान झालं, तर वार्षिक लॉकर भाड्याच्या १०० पट नुकसानभरपाई ही बँकेकडून ग्राहकाला द्यावी लागणार आहे. म्हणजे जर तुमचं लॉकरचं वार्षिक भाडं ३ हजार रुपये असेल आणि बँकेची इमारत भूकंपात पडून, त्यात लॉकरची मोडतोड होऊन ग्राहकाच्या चीजवस्तूंचे नुकसान झालं, तर जास्तीतजास्त ३ लाख रुपये नुकसानभरपाई ग्राहकाला मिळणार आहे.
ADVERTISEMENT