कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेला खिंडार पाडण्यात भाजप आणि शिवसेनेला यश आलंय. दोन दिवसांत महत्वाच्या दोन नेत्यांनी पक्षाला रामराम केला आहे. मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मानले जाणारे राजेश कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ, श्रीकांत शिंदे हे उपस्थित होते.
ADVERTISEMENT
कल्याण-डोंबिवली क्षेत्रात राजेश कदम हे मनसे पक्षातलं परिचीत नाव होतं. स्थानिक पातळीवर शिवसेनेला भिडणारा कार्यकर्ता म्हणून कदम यांची ओळख होती. इतकच नव्हे तर २००९ आणि २०१५ साली त्यांनी डोंबिवली विधानसभा मतदार संघातून आमदारकीची निवडणूकही लढवली, मात्र यात त्यांना यश आलं नाही. पण महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेमधला मोठा नेता फोडून पक्षाच्या वर्चस्वालाच धक्का लावण्याचं काम शिवसेनेने केलं आहे.
दुसरीकडे मनसेकडून विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका निभावलेल्या मंदार हळबे यांनीही भाजपाची वाट धरली. मुंबईत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हळबे यांनी भाजपात प्रवेश केला. २०१९ साली झालेल्या निवडणुकीत हळबे यांनी तत्कालीन मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याविरोधात मोठं आव्हान निर्माण केलं होतं, परंतू अखेरच्या टप्प्यात चव्हाण यांनी बाजी मारली होती. याव्यतिरीक्त स्थानिक पातळीवरही शहरातील विकासकामाचे प्रश्न सभागृहात हिरारीने मांडण्यात हळबे यांचं नाव आघाडीवर होतं. त्यामुळे दोन महत्वाच्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे मनसेला मोठा धक्का मानला जात आहे.
ADVERTISEMENT