माजलेल्या बोक्यांनी कोरोना काळात खोके खाल्ले होते. त्यांची सगळ्यांची चौकशी झालीच पाहिजे आणि या माजलेल्या बोक्यांचे चेहरे उघड झालेच पाहिजेत अशी मागणी भाजपचे नेते आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलंय आशिष शेलार यांनी?
मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. त्याबाबत आम्ही सभागृहात प्रश्न उपस्थित केले. त्याला उत्तर देताना विशेष लेखा परिक्षण आम्ही निर्गमित करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ज्याचं आम्ही स्वागत करतो. २८ नोव्हेंबर २०१९ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत दहा वेगवेगळ्या विभागात जवळजवळ १२ हजार १३ कोटींची जी कंत्राटं दिली गेली. त्यासंबंधीचा हा घोटाळा आहे.
कोरोना काळातही भ्रष्टाचार झाला आहे
कोरोना काळात मुंबईकर जीव कसा विवंचनेत होते. त्याच काळात कंत्राटदार आणि सत्तेत बसलेले लोक हे माझा खिसा कसा गरम होईल यावर लक्ष ठेवून होते असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. कोरोना काळात या कालावधीत ३ हजार ५३८ कोटींची खरेदी झाली. CAG ची चौकशी याचबद्दल केली जाणार आहे. जनतेला लागणार आहे म्हणून भूखंड विकत घेतला गेला. तो अजमेरा बिल्डरने विकत घेतला २ ते अडीच कोटीला. भूखंडाचं श्रीखंड कुणी खाल्लं त्याची चौकशी केली जाणार आहे.
चार पूल बांधले गेले त्याच्या खर्चाचीही चौकशी केली जाणार आहे
चार पूल बांधले गेले त्याची चौकशी होणार आहे. पूल चार आणि खर्च १ हजार कोटींपेक्षा जास्त. कोरोनाच्या काळात रूग्णालयात आवश्यकता दाखवून खरेदी झाली ती ९०४ कोटींची. त्याचीही चौकशी केली जाणार आहे. सुमारे ४ हजार कोटींपेक्षा जास्त खरेदी केली. कंत्राटदार बोगस, कंपन्या बोगस, एकच परिवार असं सगळं साटंलोटं झालं असाही आरोप आशिष शेलार यांनी केला.
घनकचरा व्यवस्थापनामध्ये १ हजार २४ कोटी रूपये खर्च केले गेले. २८ नोव्हेंबर २०१९ ते २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंतच्या कालावधीत जे व्यवहार केले गेले त्याची चौकशी केली जाणार आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. मुंबई महापालिकेत कसा भ्रष्टाचार झाला आहे त्याचा पाढाच आशिष शेलार यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत वाचला.
ADVERTISEMENT