शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त भाजप कार्यकर्त्यांना मोफत पेट्रोल देण्याची घोषणा करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांची आज कुडाळमध्ये पळता भुई थोडी झाली. पेट्रोल वाटपासाठी कुडाळ शहरातील पेट्रोलपंपाची जाहिरात करणाऱ्या शिवसेनेने काढते पाऊल घेत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. याचा जाब विचारण्यासाठी पेट्रोल पंपावर जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे मोर्चा वळवला.
ADVERTISEMENT
कल्पना नसताना झालेल्या या प्रकारामुळे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी पोलीस यंत्रणा वापरत भाजप कार्यकर्त्यांवर बळाचा वापर करण्यासाठी दबाब आणला असाही आरोप भाजपने केला. मात्र पोलीस यंत्रणेने तसे करण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या वैभव नाईक यांनी पोलिसांनाही धक्काबुक्की करत पोलीस अधिकाऱ्याला धक्का देत ढकलून दिले. पोलीस प्रशासनाला धक्काबुक्की करणाऱ्या आमदाराच्या निषेधाच्या जोरदार घोषणा भाजपा कार्यकर्त्यांनी दिल्यानंतर वातावरण जोरदार तापले. आमदार वैभव नाईक यांनी ताबडतोब काढता पाय घेतला.
आजही वैभव नाईक यांना आंदोलन करण्यासाठीदेखील नारायणराव राणे यांचाच पेट्रोलपंप दिसतो, हा शिवसेनेच्या 55 वर्षाच्या कारकिर्दीचा आणि वैभव नाईक यांच्या कामाचा दारुण पराभव आहे, असं मत आंदोलक भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. कायदा आणि सुव्यवस्थेची भाषा करणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत यांनी पोलिसांना भर रस्त्यावर वर्दी पकडत धक्काबुक्की करण्याऱ्या आपल्या पक्षाच्या आमदारावर गुन्हे दाखल करायची हिंमत दाखवावी, असे आव्हान भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी दिले. शिवसेना आणि आमदार वैभव नाईक यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणाबाजीने वातावरण काही काळासाठी तणावपूर्ण झाले होते.
काय आहे प्रकरण?
शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त वैभव नाईक यांनी भाजप कार्यकर्ते असल्याचे ओळखपत्र दाखवा आणि फुकट पेट्रोल घेऊन जा अशी घोषणा केली होती. कुडाळच्या एका पेट्रोल पंपावर त्यांनी नागरिकांना स्वस्तात पेट्रोल वाटप सुरु केले होते. मात्र, हा पेट्रोल पंप नारायण राणे यांच्या मालकीचा निघाला. वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल खरेदी करण्यासाठी पैसे वाटत होते. त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी आक्षेप घेतला. तेव्हा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणबाजी सुरु केली आणि एकमेकांच्या अंगावर धावून गेले. विशेष म्हणजे आमदार वैभव नाईक यांनीही या हाणामारीत भाग घेण्याचा प्रयत्न केला. ते भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावूनही गेले होते. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यानंतर वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते दुसऱ्या पेट्रोल पंपावर निघून गेले.
ADVERTISEMENT