ज्येष्ठ व्यक्तीवर उपचार करण्याऐवजी त्याला रुग्णालयाच्या दारात तसंच सोडून देणाऱ्या दोन आरोग्य कर्मचाऱ्यांवर BMC ने कारवाई केली आहे. शुक्रवारी रात्री ९ वाजता KEM रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापाशी हा प्रसंग घडला. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापाशी घडलेला हा प्रकार मनिष राऊळ या स्थानिक व्यक्तीच्या निदर्शनास आला. KEM रुग्णालयाचे दोन वॉर्ड बॉय रुग्णाला प्रवेशद्वारापाशीच सोडून जाताना राऊळ यांनी पाहिलं. त्यांनी या घटनेचं आपल्या मोबाईलमध्ये चित्रण केलं.
ADVERTISEMENT
धक्कादायक ! लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही मुंबई पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
वॉर्डबॉयने बाहेर सोडून दिलेला पेशंट हा मास्क न घातलेल्या अवस्थेत रस्त्यावर पडून होता. या रुग्णाला चालवत ही नव्हतं अशी माहिती राऊळ यांनी दिली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर BMC ने दोन्ही वॉर्ड बॉयवर कारवाई केली आहे. KEM हॉस्पिटलने दिलेल्या स्पष्टीकरणात, “वॉर्ड बॉयने ज्या रुग्णाला प्रवेशद्वारापाशी सोडलं त्याच्यावर तळ मजल्यावर असलेल्या सर्जनद्वारे उपचार होणार होते. परंतू दोन्ही वॉर्डबॉयने त्या रुग्णाला प्रवेशद्वाराशीच सोडून दिलं. त्यामुळे या घटनेची चौकशी करुन CCTV मध्ये जे वॉर्डबॉय रुग्णाला अशा पद्धतीने सोडून निघून गेले त्यांच्यावर कारवाई करुन त्यांना निलंबीत करण्यात आलं आहे. दोन्ही वॉर्डबॉय हे कंत्राटी पद्धतीने लागलेले वॉर्डबॉय होते.”
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर BMC प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी तात्काळ कारवाईची पावलं उचलली. दरम्यान त्या रुग्णाबद्दल नेमकी माहिती कळू शकलेली नसली तरीही त्यांना यानंतर रुग्णालयात भरती करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. व्हिडीओत व्हायरल झालेल्या रुग्णाच्या पोटात दुखायला लागल्यामुळे त्यांना तळमजल्यावर असलेल्या सर्जनकडे पुढील तपासासाठी पाठवण्यात आलं होतं. यासाठी त्यांच्यासोबत दोन वॉर्डबॉयलाही पाठवण्यात आलं होतं. दरम्यान दोन्ही वॉर्डबॉयनी या पेशंटला तळ मजल्यावर असलेल्या सर्जनपर्यंत पोहचवलं नाही असं चौकशीअंती स्पष्ट झालं, ज्यानंतर दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT