मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांना धमकी देणाऱ्याला बिहारमध्ये अटक करण्यात आली आहे. बिहारच्या दरभंगा शहरातून आरोपी राकेश कुमार मिश्रा याला अटक करण्यात आली आहे. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये फोन करून त्याने धमकी दिली होती. मुकेश अंबानी यांना धमकी दिल्या प्रकरणी आरोपीला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. राकेश कुमार मिश्रावर आयपीसीच्या कलम ५०६(२), ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
काय आहे प्रकरण
प्रसिद्ध व्यावसायिक मुकेश अंबानी यांना धमकी देण्यात आली होती. बिहारच्या ब्रह्मपुरा या गावात राहणाऱ्या राकेश कुमारला बुधवारी अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी या राकेश कुमारला पुढच्या तपासासाठी मुंबईत आणलं आहे. बुधवारी संध्याकाळी ४ च्या दरम्यान राकेश कुमारला अटक करण्यात आली आहे.
राकेशला पोलिसांनी अटक नेमकी कशी केली?
सुरूवातीला पोलिसांनी राकेशच्या मोबाईलवर फोन केला. हा फोन राकेशने उचलला. राकेशच्या मोबाईलचं लोकेशन कन्फर्म झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. राकेश कुमारने १ वाजण्याच्या सुमारास रिलायन्स फाऊंडेशनच्या सर एच. एन. हॉस्पिटलच्या लँडलाईनवर फोन केला. त्याने हे हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. तसंच मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या आरोपीला पोलिसांनी मुंबईत आणलं आहे त्याची कसून चौकशी सुरू आहे.
नेमकी काय घडली होती घटना?
बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास रिलायन्स फाउंडेशनच्या सर एचएन हॉस्पिटलच्या लँडलाईन क्रमांकावर एका अज्ञात नंबरवरुन कॉल आला होता. हे हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी या कॉलच्या माध्यमातून देण्यात आली. एवढ्यावरच धमकी देणारा थांबला नाही, तर मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनाही जीवे मारण्याची धमकी यावेळी देण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एकाला बिहारमधून अटक केली आहे.
ऑगस्ट महिन्यातही आला होता धमकीचा फोन
रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकीचा फोन हा पहिल्यांदा आला नसून या अगोदर देखील त्यांना धमकी देण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या सार्वजनिक दूरध्वनी क्रमांकावर एका अनोळखी नंबरवरून धमकी देणारा एक फोन कॉल आला होता. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर रिलायन्स हॉस्पिटल आणि त्यांचे निवासस्थान असलेल्या अँटेलिया या ठिकाणी पोलिस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सर्व बाजूने तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT