– समीर शेख, पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी
ADVERTISEMENT
परीक्षा कोणतीही असो त्यात कॉपी करण्यासाठी प्रत्येकवेळा विद्यार्थी नवनवीन शक्कल लढवत असतात. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेकदा हायटेक डिव्हाईसच्या माध्यमातून कॉपी केल्याचं आपण पाहिलं असेल. पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस भरतीच्या परीक्षेत असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिथे उमेदवाराने चक्क आपल्या मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस सेट केले होते.
हिंजवडी येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत ७९० जागांसाठी शुक्रवारी लेखी परीक्षा घेण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील ८० केंद्रावर आज परीक्षा घेण्यात आली. यावेळी हिंजवडी केंद्रावर आलेल्या आरोपी उमेदवाराच्या मास्कचं वजन जास्त असल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याच्या लक्षात आलं. यानंतर मास्कची तपासणी केली असता पोलिसांना त्यात इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस सेट केल्याचं दिसलं. इतकच नव्हे तर यात एक सिमकार्डही पोलिसांना मिळालं. यादरम्यान आरोपीने परीक्षा केंद्रावरुन पळ काढला. रात्री उशीरापर्यंत या प्रकरणात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रीया सुरु होती.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी राज्यभरातून हजारे मुलं आली होती. कॉपी तसेच डमी विद्यार्थी असे प्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रावर व्हिडीओ शुटींग करण्यात येत होतं. त्याचसोबत भरारी पथकाची नेमणूकही यादरम्यान करण्यात आली होती. परंतू परीक्षा सुरु व्हायच्या आधीच हा प्रकार उघडकीस आल्यामुळे पोलीस चक्रावून गेले आहेत.
काकड आरतीचा महाप्रसाद खाल्ल्यामुळे दोनशेहून अधिक भाविकांना विषबाधा
ADVERTISEMENT