टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली आहे. वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क या दोन प्रकल्पांच्यानंतर तिसरा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारवर चहूबाजूने टीका सुरू झाली आहे. राज्यातले प्रकल्प गुजरातला नेण्यासाठीच सत्तांतर करण्यात आलं असा आरोप सुभाष देसाई यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी?
राज्यातले प्रकल्प गुजरातला नेण्यासाठीच सत्तांतर करण्यात आलं. सत्तांतर झाल्यानंतर वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क आणि आता टाटा एअर बस प्रकल्प गुजरातला गेला. हे तीन मोठे प्रकल्प राज्याबाहेर जाऊनही यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्र देखील काढत नाही. भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारकडून राज्यातील उद्योग पळवापळवी करण्यासाठीच मिंधे सरकार आणलं गेलं आहे अशी बोचरी टीका देसाई यांनी केली.
आणखी काय म्हणाले सुभाष देसाई?
टाटा एअरबसचा प्रकल्प २२ हजार कोटींचा होता. या प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा सुरू होतील. तरीही हा प्रश्न राज्याबाहेर का गेला? असा प्रश्नही सुभाष देसाई यांनी विचारला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तीन मोठे प्रकल्प गुजरातला गेल्याने शिंदे फडणवीस सरकारच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण होतो आहे. केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला समान न्याय दिला पाहिजे अशीही मागणी सुभाष देसाई यांनी केली.
हिमाचल प्रदेशच्या निवडणुका जाहीर झाल्यात. पण गुजरातच्या निवडणुका जाहीर झाल्या नाहीत. दरवेळेस हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुका एकत्रित जाहीर होतात. यंदा मात्र, योग्य वेळी घोषणा होईल असे निवडणूक आयुक्तांनी म्हणत पत्रकार परिषद आटोपती घेतली. गुजरातमध्ये सध्या विविध प्रकल्पांची घोषणा, भूमिपूजन आदी कार्यक्रम सुरू आहेत. भाजप सरकारला वेळ मिळावा यासाठीच गुजरातची निवडणूक जाहीर झाली नाही का, असा प्रश्न देसाई यांनी उपस्थित केला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
काय म्हटलं आहे उदय सामंत यांनी?
आदित्य ठाकरेंनी केलेले आरोप मी समजू शकतो. विरोधक म्हणून ते आरोप आम्हाला अपेक्षितही आहेत. मात्र यामुळे युवा पिढीत संभ्रम निर्माण करू नये ही माझी विनंती आहे.मी एका मुलाखतीत हा उल्लेख केला होता की हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. मात्र माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की २१ सप्टेंबर २०२१ ला म्हणजेच महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाचा MOU झाला होता. म्हणजेच वर्षभरापूर्वीच हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार नाही हे निश्चित झालं होतं असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT