मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारपासून महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. नंदुरबारमधून या दौऱ्याला सुरूवात होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मराठवाडा दौरा केला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.
ADVERTISEMENT
ठाकरे गटाचे बालेकिल्ले असलेल्या ठिकाणीही जाणार
ठाकरे गटाचे बालेकिल्ले असलेल्या ठिकाणीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार आहेत. या दौऱ्यामुळे भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन पक्षांची युती लोकांपर्यंत पोहचवण्याचा मानस आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्रित दौरा करणार आहेत. बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष मजबूत करण्यासाठी दहीहंडी, गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकांमध्ये जाऊन उत्सव साजरा करताना दिसले. त्यानंतर आता हा दौरा महत्त्वाचा मानला जातो आहे.
दिवाळीचं औचित्य साधून लोकांशी संवाद साधणार
दिवाळीचं औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकांसोबत संवाद साधणार आहेत. दिवाळीचा फराळ लोकांसोबत घेत ते संवाद करणार आहेत. ठाणे शहरातून दिवाळी पहाटचा कार्यक्रम सुरू करून दिवाळीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला होता. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईतल्या दहिसर आणि कांदिवली भागात जाणार आहेत. तिथल्या दिवाळी कार्यक्रमात ते उपस्थित असणार आहेत. उपस्थितांशी ते संवाद साधणार आहेत.
राज्याचा दौरा काही ठिकाणी मुख्यमंत्र्यांसोबत तर काही ठिकाणी वेगळा
मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्ही महाराष्ट्राचा दौरा करणार आहोत काही ठिकाणी हा दौरा सोबत असेल तर काही ठिकाणी वेगळा असेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. देवेंद्र फडणवीस हे आज नागपूर मध्ये आले आहेत. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी दौऱ्याबाबत ही माहिती दिली.
ADVERTISEMENT