राज्यभरात गाजलेल्या पुजा चव्हाण आत्महत्याा प्रकरणी शिवसेनेचे आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे महाविकास आघाडी सरकारला राठोडांचा राजीनामा घ्यावा लागला होता. परंतू याच प्रकरणात पुणे पोलिसांनी संजय राठोड यांना क्लीन चिट दिली असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत होत्या.
ADVERTISEMENT
परंतू या प्रकरणाचे तपास अधिकारी दीपक लगड यांनी ही बाब फेटाळून लावली आहे. “या प्रकरणाची अजुनही चौकशी सुरु आहे आणि कोणालाही क्लीन चिट देण्यात आलेली नाही. आमचा कोणावरही आरोप नाही असा जबाब पुजाच्या आई-वडिलांनी याआधीच नोंदवला होता, हा जबाब काही नव्याने नोंदवलेला नाही.” पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीही याप्रकरणी तपास सुरु असल्याचं सांगत कोणालाही क्लीन चिट देण्यात आलेली नसल्याचं सांगितलं.
पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आमचा कोणावरही आरोप नाही, मुलीच्या मृत्यूला राजकीय वळण देण्यात आलं. जे काही घडलं तो सर्व पॉलिटीकल ड्रामा होता असा जबाब मुलीच्या आई-वडिलांनी वानवडी पोलीसांकडे नोंदवल्याची माहिती समोर येत होती. काही दिवसांपूर्वी संजय राठोड पुन्हा एकदा मंत्रीमंडळात परतणार असे संकेत शिवसेनेच्या एका नेत्याने दिले होते. या पार्श्वभूमीवर राठोडांना क्लिन चीट दिल्याच्या बातम्या समोर यायला लागल्यामुळे राजकीय वर्तुळांत चर्चांना उधाण आलं होतं.
काय आहे प्रकरण?
संबंधित तरुणीने सात फेब्रुवारी रोजी पुण्यातील महंमदवाडी भागातील इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यानंतर तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे आरोप झाले होते. विरोधकांनी रान पेटवल्यानंतर राठोड काही काळ नॉट रिचेबल झाले होते. काही दिवसांनी यवतमाळमध्ये पत्रकार परिषदेत घेत राठोड यांनी आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला होता, मात्र विरोधीपक्षांनी अधिवेशन चालू न देण्याची भूमिका घेतल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचं संजय राठोड यांनी स्पष्ट केलं होतं. मुंबईला येऊन 28 फेब्रुवारीला त्यांनी राजीनामा दिला होता.
ADVERTISEMENT