– गणेश जाधव, उस्मानाबाद प्रतिनिधी
ADVERTISEMENT
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे सध्या वाहत आहेत. या निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधले तिन्ही पक्ष एकत्र लढण्याचा विचार करत आहेत. राज्यातील नेतृत्व जरीही एकत्र येऊन लढण्याच्या गोष्टी करत असलं तरीही ग्रामीण पातळीवर ही आघाडी स्थानिक कार्यकर्त्यांना रुचलेली पहायला मिळत नाहीये. याचंच एक उदाहरण उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पहायला मिळालं.
भाजपला हरवण्यासाठी महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष इकडे एकत्र लढले आणि त्यांना अपेक्षित यशही मिळालं. परंतू अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संधान साधून हातमिळवणी केली आणि शिवसेनेला एकट पाडलं. शिवसेनेचं एक मत फुटल्यामुळे जिल्हा बँकेवर आता काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आली आहे.
उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीत पडलेली ही फूट सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आज झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे बापूराव पाटील अध्यक्षपदी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर मोठे उपाध्यक्षपदी निवडून आले. दोघांनाही ११ मत पडली. शिवसेनेचं एक मत फुटल्यामुळे त्यांच्या उमेदवाराला ४ मत पडली आहेत.
मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुका लांबणार?; विधेयकाला विधानसभेची मंजुरी
शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं मत फुटल्यामुळे शिवसेनेला या निवडणुकीत धक्का बसला आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचं राजकारण हे सध्यातरी ओमराजे निंबाळकर विरुद्ध राणा पाटील या दोन दिग्गज नेत्यांच्या भोवती फिरत आहे. राणा पाटील यांना नामोहरम करण्यासाठी ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन भाजपला हरवण्याचा प्लान आखला होता. या प्लानमध्ये महाविकास आघाडीला अपेक्षित यशही मिळालं. तिन्ही पक्षांचे ५-५ उमेदवार निवडूनही आले होते.
…तर विधानसभेत फाशी घेईन, आमदार रवी राणा विधानसभेत आक्रमक
परंतू ऐनवेळी घडलेल्या घडामोडींमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवत एक मत फोडलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसांपूर्वी उस्मानाबाद दौऱ्यावर आले असतानाच ही रणनिती ठरल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात रंगताना दिसत आहे. मतदान प्रक्रीया पार पडल्यानंतर बँकेचे नवे चेअरमन बापूराव पाटील यांनी, कोणताही फॉर्मुला ठरला नव्हता आणी यापुढेही ठरला नाही अशी सूचक प्रतिक्रीया दिली. त्यामुळे आगामी काळाता जिल्ह्याच्या राजकारणात महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडू शकते असं बोललं जातंय. आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत् समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे गणित फिस्कटणार असल्याचे सध्या तरी दिसते आहे.
ADVERTISEMENT