मुंबई : “नायजेरियातून आणलेल्या चित्त्यांमुळे संपूर्ण भारतात लंपी आजार पसरला”, या अजब दाव्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या चांगलेच ट्रोल होऊ लागले आहेत. त्यांच्या या दाव्यावर आता केंद्रातील भाजप नेत्यांनंतर राज्य भाजपनेही निशाणा साधला. प्रादेशिक पप्पू होण्यासाठी तुम्ही धडपड करत आहात, आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला, असं ट्विट करुन भाजपने पटोले यांची खिल्ली उडविली.
ADVERTISEMENT
काय म्हटले भाजपने?
नाना पटोले यांना उद्देशून केलेल्या ट्वीटमध्ये भाजपने म्हटले की, राज्यात काँग्रेस ही सर्कस आहे. नाना पटोले त्यात जोकर आहेत, नाना, चित्ते नामीबिया मधून आणले आहेत, नायजेरिया मधून नाही. प्रादेशिक पप्पू होण्यासाठी तुम्ही धडपड करत आहात, आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. अहो नाना पटोले, तुम्हाला माहिती नसेल तर माहिती घ्या. जनावरील ‘लंपी’ रोग हा सर्वप्रथम कॉंग्रेस शासित राज्य राजस्थानमध्ये आढळला आणि तिथून पसरला गेला देशभरात. कोविड काळात कॉंग्रेस शासित राज्यांनी कोविड पसरवून दिला तसे ‘लंपी’ बद्दल केले.
नाना पटोले लंपी रोगाबाबत काय म्हणाले?
नाना पटोले सोमवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले, लंपी हा आजार नायजेरियातून आला आहे. देशात चित्तेही नायजेरियातून आणले आहेत. चित्त्यांच्या आणि गायींच्या अंगावरचे ठिपकेही सेम आहेत. मोदी सरकारने जाणूनबुजून शेतकऱ्यांचं नुकसान चित्त्यांना भारतात आणलं” असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.
नाना पटोलेंच्या वक्तव्याला ज्योतिरादित्य सिंधियांचे उत्तर
नाना पटोले यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही उत्तर दिले आहे. नाना पटोलेजी चित्ते नामिबियातून आणले आहेत, नायजेरियातून नाही. असं म्हणत हात जोडणारा इमोजीही त्यांनी यासोबत जोडला आहे.
राम कदम यांनीही दिलं नाना पटोलेंना उत्तर
भाजप आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी नाना पटोले यांच्यावर टीका करताना म्हटले की, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक अजब शोध लावला आहे. त्यांचं म्हणणं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतात चित्ते आले, पण त्यांच्यामुळे जनावरांमध्ये लंपी आजार पसरला. काय झालंय काय काँग्रेसच्या नेत्यांना? माध्यमांनी आपल्या बातम्या दाखवव्यात यासाठी हा सगळा खटाटोप आहे की बुद्धिमत्तेची घसरण? नेमकं काय चाललंय? या अभूतपूर्व शोधासाठी काँग्रेस पक्षाला नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे असाही टोला राम कदम यांनी लगावला.
ADVERTISEMENT