लस नाही, तर पगारही नाही! लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात प्रशासन आक्रमक

मुंबई तक

• 09:44 AM • 11 Dec 2021

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग दिला जात आहे. केंद्राने ‘हर घर दस्तक’ अभियान सुरू केलं आहे. त्यामुळे गोदिंया जिल्ह्यात वेगानं लसीकरण केलं जात आहे. असं असलं तरी शासकीय सेवेतील कर्मचारीच लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर गोदिंया जिल्हा प्रशासनाने ‘लस नाही, तर पगार नाही’, अशी भूमिका घेतली आहे. गोंदिया जिल्ह्यात कोरोना संसर्ग […]

Mumbaitak
follow google news

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग दिला जात आहे. केंद्राने ‘हर घर दस्तक’ अभियान सुरू केलं आहे. त्यामुळे गोदिंया जिल्ह्यात वेगानं लसीकरण केलं जात आहे. असं असलं तरी शासकीय सेवेतील कर्मचारीच लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर गोदिंया जिल्हा प्रशासनाने ‘लस नाही, तर पगार नाही’, अशी भूमिका घेतली आहे.

हे वाचलं का?

गोंदिया जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी असला तरी धोका मात्र टळलेला नाही. सद्यस्थितीत कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व ओमायक्रॉन व्हेरिएंटची राज्यात वाढती रुग्ण संख्या बघता जिल्ह्यात आवश्यक त्या उपाययोजना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यात कोविड लसीकरणाची मोहिम प्रभावीपणे राबविली जात आहे. जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून गावागावात लसीकरण करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्ह्यात कोविड लसीकरणाचे प्रथम डोज 89 टक्के पूर्ण झालेले आहे. उर्वरित 11 टक्के पात्र नागरिकांना लसीकरणाचा प्रथम डोज पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती ठोस पाऊले उचलीत आहे.

दुसरा डोज घेणाऱ्यांची संख्या 58 टक्के आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘हर घर दस्तक’ ही मोहीम जिल्ह्यात 3 नोव्हेंबर पासून ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत राबविण्यात येत आहे. सदर कालावधीत आरोग्य विभागातील कर्मचारी घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करीत असून पात्र नागरिकांना कोविड लसीकरणाचे दोन्ही डोज नियमीत अंतराने घेण्याबाबतचे समुपदेशन करीत आहेत.

आशा सेविकांमार्फत लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, बँक आदी विभागांना कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे कोविड लसीकरणाचे दोन्ही डोज नियमीत अंतराने न घेतल्यास संबंधितांचे वेतन थांबविण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील कोविड लसीकरणाचे प्रमाण 100 टक्के होण्याच्या दृष्टीकोनातून सर्व विभागप्रमुखांनी आपले अधिनस्त कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र जमा करुन कोषागार कार्यालयात पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण (दोन्ही डोज) झाल्याचे प्रमाणपत्र सादर करणार नाही, त्यांचे डिसेंबर 2021 चे वेतन दिले जाणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

    follow whatsapp