मुंबई : शिवसेनेतील शिंदे-ठाकरे गटामध्ये मध्यरात्री प्रभादेवीमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी ठाकरे गटाच्या २५ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांच्या फिर्यादीवरून दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेमधील कलम 143, 147, 148, 149, 395, 324, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दादर पोलिसांनी ठाकरे गटाचे शाखाप्रमुख महेश सावंत यांच्यासह शैलेश माळी, संजय भगत आणि इतर दोघे अशा ५ जणांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
संतोष तेलवणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी प्रभादेवी जंक्शन येथे शिंदे गटाच्यावतीने गणेश भक्तांसाठी पाण्याचा स्टॉल लावण्यात आला होता. त्याच्या शेजारी ठाकरे गटाचे शाखाप्रमुख महेश सावंत यांनीही स्टॉल लावला होता. त्यावेळी दोघांमध्ये वादची ठिणगी पडली होती. त्यावेळी हा मिटवण्यात आला होता. मात्र, महेश सावंत यांनी राग मनात ठेवून रविवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास हल्ला केला.
महेश सावंत यांच्यासह शैलेश माळी, संजय भगत, विनायक देवरुखकर, विपुल ताटकर, यशवंत विचले आणि 20 ते 25 कार्यकर्ते बांबू, चॉपर, लाठ्या काठ्यांसह आले. शिविगाळ करत अंगावर धावून आले आणि आपल्याला मारहाण केली. यावेळी, पोलीस आल्यानंतर झालेल्या धावपळीत गळ्यातील 30 ग्रॅम सोन्याची चैन, पंचमुखी रुद्राक्षासह पळवून नेली, असाही आरोप तेलवणे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
प्रभादेवीमध्ये राडा झाल्यानंतर दादरमध्येही दोन्ही गट आमने-सामने :
प्रभादेवीमध्ये झालेल्या राड्यानंतर दोन्ही गट मध्यरात्री २ ते ४ च्या दरम्यान दादर पोलीस स्टेशन परिसरातही आमनेसामने आले. यावेळी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. यामध्ये महेश सावंत थोडक्यात बचावले असल्याचा दावाही करण्यात येत आहे. मात्र, सदा सरवणकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ठाकरे गटाच्या वतीने याप्रकरणी सरवणकर यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली असून पोलीस याबाबत तपास करत आहेत.
ADVERTISEMENT