राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अनेकदा आपल्याच पक्षातील आमदार, कार्यकर्त्यांना अजित दादांनी भर कार्यक्रमात झापलेलं महाराष्ट्राने पाहिलं आहे. रविवारी झालेल्या कार्यक्रमात अजितदादांनी आपला पुतण्या आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनाही मास्क न घातल्यामुळे सुनावलं.
ADVERTISEMENT
यानंतर बारामतीत एका कार्यक्रमादरम्यान बोलत असताना अजित पवारांनी DYSP अधिकाऱ्याला चांगलंच खडसावलं. तुम्हाला चांगले अधिकारी म्हणून बारामतीत आणलं, मग दारुबंदी करायला काय अडचण आहे असा प्रश्न अजितदादांनी विचारला.
व्यासपीठावर अजित पवार असताना त्यांना एका महिलेनं निवेदन दिलं. ते निवेदन दारुबंदीवरुन होते तसेच पती दारु पिऊन त्रास देत असल्याचे निवेदनात महिलेनं सांगितले. पती दारू पिऊन घरी आल्यावर मारहाण करतो अशी व्यथा महिलेनं मांडली. तसेच जिल्ह्यात दारुबंदी करण्यासंदर्भात मागणी अजित पवार यांच्याकडे केली.
सभेत व्यासपीठावर बोलत असताना अजित पवार यांनी महिलेचे निवेदन हातात धरले आणि डीवायएसपी गणेश इंगळेंना आवाज दिला. अजित पवार म्हणाले की, “डीवायएसपी या ठिकाणी दारुबंदी व्हावी म्हणून मला निवेदन आलं आहे. २००७ मध्ये दारुबंदी करण्यात आली होती परंतु काही जणांनी पुन्हा सुरु केली आहे. येथील गोरगरीब महिलांना आता याचा त्रास होत आहे. दारुबंदी करण्यामध्ये काय अडचण आहे? जिल्ह्यात कायमची दारुबंदी करुन टाका आणि जर कोण मध्ये आले तर त्यांच्यावर टाडा लावा नाहीतर काय लावायचे ते लावा पण दारुबंदी करुन टाका. मी तुम्हाला चांगले डीवायएसपी म्हणून बारामतीमध्ये आणले होते. अवैध धंध्यांवर कारवाई करा. मी याबद्दल एस.पी. शी बोलणार आहे. अशा शब्दात अजित पवारांनी अधिकाऱ्याला फैलावर घेतले.”
काही दिवसांपूर्वी अजित पवार कर्जत-जामखेडमध्ये विकासकामांच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते. तिकडे कोणीच मास्क घालत नसल्याचे पाहिले. यावरुन अजित पवारांनी स्थानिक आमदार रोहित पवारांनाच झापलं आहे. अजित पवार बारामतीमध्ये एका कार्यक्रमात म्हणाले की, कर्जतमध्ये कोणीच मास्क घालत नव्हते. आमच्या रोहितनेही मास्क घातला नव्हता. रोहितला म्हटलं, अरे शहाण्या…तू आमदार आहेस. तू मास्क वापरला तर मला इतरांना सांगता येईल. मी भाषण करताना मास्क काढत नाही राव आणि तू मास्क वापरत नाही. हे बरोबर नाही. कोरोनाची तिसरी लाट आल्यास आपल्याला मोठी किंमत मोजावी लागेल. अशा शब्दात अजित पवारांनी रोहित पवार यांना झापलं.
ADVERTISEMENT