सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांची बिनविरोध निवड झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा उदयनराजे भोसले यांच्या जागेला विरोध होता. मात्र, आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी उदयनराजे भोसले यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांनी माघार घेतले आहेत. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे.
ADVERTISEMENT
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी गृहनिर्माणमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यानंतर त्यांचेच चुलत बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांना विरोध दर्शविला होता. दोघांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. या दरम्यान खासदार उदयनराजे यांनी जिल्हा बँक आणि यातील पदाधिकाऱ्यांवर तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले होते.
यामुळे राष्ट्रवादीमध्ये त्यांच्या विरोधात प्रचंड नाराजी दिसत होती. परंतु दिवाळीनंतर उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या आणि भाजपा तसेच काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी केल्यामुळे उदयनराजेंचा जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा मार्ग मोकळा झाला.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात नामदेव सावंत, दादासाहेब बडदरे, ज्ञानेश्वर पवार, जयवंत पाटील, दिलीपसिंह भोसले यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे खासदार उदयनराजे भोसले बिनविरोध निवडून आले यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून घोषणाबाजी करत मोठा जल्लोष केला.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचीही बिनविरोध निवड
दुसरीकडे सातारा तालुका विकास सेवा सोसायटीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विरोधात विनय कडव आणि पांडुरंग देशमुख यांनी अर्ज दाखल केले होते. पण त्यांनीही अर्ज मागे घेतल्याने आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही बिनविरोध निवडून आले. त्यानंतर दोन्ही राजे समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली.
भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतली कार, मग चर्चा तर होणारच!
निवडणुकीआधी साताऱ्यात नेमकं काय होतं सुरु?
साताऱ्यातील जिल्हा बँक निवडणुकीआधी दोन्ही राजेंमध्ये चांगलच बिनसलं होतं. एकमेकाच्या विरोधात जोरदार आरोप-प्रत्यारोप, डायलॉगबाजी झाली. मात्र आज सातारा जिल्हा बँकेच्या अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकमेका सहाय्य करू.. हेच पाहायला मिळालं. यावेळी दोघांनीही एकमेकांना मदत केल्याचं पाहायला मिळालं आणि दोन्ही राजे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही राजेंमध्ये असणारा अबोला दूर झाला. दस्तुरखुद्द उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या घरी जाऊन त्यांना बुके देऊन त्यांचे आभार व्यक्त केले.
ADVERTISEMENT