2024 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री? बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं ‘व्हिजन’

मुंबई तक

18 Dec 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:24 AM)

भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या युतीचं सरकार राज्यात स्थापन झालं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. पण, 2024 मध्ये भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचं सरकार आलं, तर मुख्यमंत्री कोण असणार, असा प्रश्न सारखा डोकं वर काढतोय. त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी एक विधान करत भाजपची रणनीती स्पष्ट केलीये. इतकंच नाही तर 2024 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

Mumbaitak
follow google news

भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या युतीचं सरकार राज्यात स्थापन झालं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. पण, 2024 मध्ये भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचं सरकार आलं, तर मुख्यमंत्री कोण असणार, असा प्रश्न सारखा डोकं वर काढतोय. त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी एक विधान करत भाजपची रणनीती स्पष्ट केलीये. इतकंच नाही तर 2024 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असे स्पष्ट संकेत बावनकुळे यांनी केलं.

हे वाचलं का?

बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपनं युती करत महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, असा ठाम अंदाज व्यक्त केला जात होता. पण, भाजपच्या दिल्लीतल्या नेतृत्वानं सगळ्यांचा अंदाज चुकवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं.

अचानक अस्तित्वात आलेल्या सरकारचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलं असलं, तरी राज्यात 2024 पुन्हा युतीचं (भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना) सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण असेल; याची चर्चा आतापासूनच सुरूये.

मागील काही महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही 2024 मध्ये युतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण असणार, असा प्रश्नही विचारला गेलाय. मात्र, दोन्ही नेत्यांनी याबद्दल राजकीय उत्तरं दिली. असं असलं तरी 2024 मध्ये युतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील, हे भाजपकडून स्पष्ट सांगितलं जात आहे.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलत होते. तिथेच त्यांनी भाजपची 2024 चं व्हिजन कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवलं. ‘जो समाज त्यांच्याकडे (देवेंद्र फडणवीस) गेला, ज्या कुठल्या समाजावर अन्याय झाला; त्यांच्यावरील अन्याय देवेंद्र फडणवीसांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज आपली सर्वांची जबाबदारी आहे की, मी भाजपाचा प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. त्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. महाराष्ट्राचं भविष्य केवळ देवेंद्र फडणवीस बदलू शकतात,’ असं म्हणत बावनकुळेंनी युतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील असे संकेत दिलेत.

याच कार्यक्रमात बावनकुळेंनी असंही म्हटलंय की, ‘आपली सर्वांची जबाबदारी आहे की, 2014 ते 2019 चा काळ पुन्हा महाराष्ट्रात आला पाहिजे.’ बावनकुळेंनी यावेळी कार्यकर्त्यांना एक प्रश्न केला. ते म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे काय झाले पाहिजेत? त्यावर उपस्थितांनी उत्तर दिलं की ‘मुख्यमंत्री’. या उत्तराला सहमती दर्शवत बावनकुळेंनी 2024 च्या निवडणुका देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली होतील, असेच संकेत दिले.

    follow whatsapp