विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या आठ वर्षांपासून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. दिल्लीच्या सहकार्याने देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना संपवण्याचं राजकारण केलं आहे. आता त्यांना शिवसेना काय आहे हे समजू लागल्याने अशा प्रकारची विधाने ते करत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना लगावला.
ADVERTISEMENT
पाच वर्षाचा निकाल पाहिला तर भाजपमुळे शिवसेनेचे खच्चीकरण झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी २५ वर्ष युतीत सडलो असे विधान केले आहे. मात्र आता शिवसेनेची ताकद वाढताना दिसत आहे. आता जे नगरपालिकांचे निकाल आले त्यावरुन भाजपसोबत राहिल्याने कमकुवत झालेल्या शिवसेनेचा ग्राफ कितीतरी पटीने वाढलेला दिसला असेही नवाब मलिक म्हणाले.
बाळासाहेब ठाकरेंनी युतीचा निर्णय घेतला होता. शिवाय ते हयात असतानाही त्यांनी युतीतून बाहेर पडण्याचा विचारही केला होता. आम्ही काँग्रेससोबत असताना सेनेकडून राष्ट्रवादी सोबत आली पाहिजे हा प्रस्ताव होता.मात्र काही कारणामुळे जमले नाही असेही नवाब मलिक यांनी सांगितले. २०१९ च्या आधीपासून भाजपसोबत खच्चीकरण होतेय ही चर्चा सुरू होती. भाजप ज्या पक्षांसोबत युती करतो त्यांचे खच्चीकरण करतो हे शिवसेनेला अगोदरच कळले होते त्यामुळे सेनेने भूमिका घेऊन भाजपला बाजूला केले असेही नवाब मलिक म्हणाले.
शिवसेनेसोबत असताना भाजप मोठा झाला हे आता देवेंद्र फडणवीस यांना समजले आहे. मात्र गेल्या आठ वर्षापासून देवेंद्र फडणवीस सेनेला संपवण्याचे राजकारण करत होते असा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.
‘भाजपचं हिंदुत्व गाढवाने पांघरलेल्या वाघाच्या कातड्यासारखं’-उद्धव ठाकरे
दोन दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी टार्गेट केलं ते भाजपला. भाजपसोबत युतीतली 25 वर्षे सडली या आपल्या वक्तव्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. एवढंच नाही तर भाजपचं हिंदुत्व हे गाढवाने पांघरलेल्या वाघाच्या कातड्यासारखं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. ईडी, सीबीआय, आयटी यांना बाजूला करून दोन-दोन हात करा असंही आव्हान त्यांनी दिलं आहे. या सगळ्या आक्रमक भाषणानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं.
उद्धव ठाकरेंची सत्तेसाठीची लाचारी काय? देवेंद्र फडणवीस यांनी थेटच सांगितलं, म्हणाले….
बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होती. आमची युती तुटली आहे तरीही बाळासाहेब ठाकरेंना आम्ही अभिमानाने वंदन करतो. मात्र वंदन तर सोडाच.. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्याकडून एखादं ट्विट तरी बाळासाहेबांबद्दल आलं का? तरीही उद्धव ठाकरे अशा काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसले आहेत इथेच त्यांची लाचारी दिसते असं म्हणत फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा समाचार घेतला. अशात आता नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना फडणवीस उत्तर देणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT