प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक
ADVERTISEMENT
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठक आणि इतर कार्यक्रम रद्द करून शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं. मुंबईतल्या पूर्वनियोजित बैठका आणि सगळे इतर कार्यक्रम रद्द करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टरने शिर्डीला पोहचले. तिथे त्यांनी सपत्नीक साईबाबांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं. या दर्शनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईला येणं अपेक्षित होतं. मात्र त्याचवेळी त्यांचा ताफा सिन्नरमधल्या मिरगावात दाखल झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवनिका संस्थान मिरगावच्या ईशान्येश्वर मंदिराला भेट दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरही उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवनिका संस्थानचे अध्यक्ष कॅप्टन अशोककुमार खरात यांचीही भेट घेतली.
पंचक्रोशीत काय चर्चा रंगली आहे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या दौऱ्यानंतर पंचक्रोशीत चर्चा रंगली ती ज्योतिषी बाबाकडून त्यांनी आपलं भविष्य जाणून घेतल्याची, शिवनिका संस्थान हे फार कमी लोकांना माहीत आहे, अलिकडचे देवस्थान असल्याने कुणाला फारसे परिचित नाही, मात्र तेथे अनेक लोक हे भविष्य बघण्यासाठी जातात. त्यांच्या या दौऱ्यावर अंनिसने आक्षेप घेतला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिर्डीत पोहोचून सपत्नीक साईमंदिरात हजेरी लावून साईंचे दर्शन घेतले. शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय दौऱ्यानुसार ते मुंबईकडे रवाना होणार होते. मात्र अचानक त्यांचा ताफा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगावच्या दिशेने रवाना झाला. अचानक बदललेल्या या दौऱ्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली.
मिरगाव दौऱ्याची गोपनियता
मिरगावच्या शिवारात पोहचल्यानंतर त्या ठिकाणी महादेवाच्या मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांच्या या मिरगाव दौऱ्याची अत्यंत गोपनियता ठेवण्यात आली होती. तिथे मुख्यमंत्री एका ज्योतिषी बाबाला भेटले आणि त्यांनी त्यांचं भविष्य जाणून घेतले, अशी चर्चा आणि नाशिकमधील शिंदे समर्थकांत सुरू झाली आहे. मात्र याच गोष्टीवर अंनिसने आक्षेप घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भविष्य जाणून घेतल्याची चर्चा
मुख्यमंत्री ज्यांना भेटले ते भविष्यवाणी करत असल्याची माहिती आहे. त्यांच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री अचानक शिर्डीत आले आणि मिरगावात भविष्य पाहायला पोहोचले अशीच चर्चा होत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषकडून खरंच भविष्य जाणून घेतलं का? आणि भविष्य जाणून घेतलं असेल तर नेमकी काय माहिती विचारली? असे एक ना अनेक प्रश्न उभे राहत आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नेमकं काय म्हटलं आहे?
या सगळ्या प्रकारावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते ज्या ज्योतिषाला मुख्यमंत्री भेटले त्या ज्योतिषाविरोधात अंनिस कडे तक्रारी आल्या आहेत, मुख्यमंत्री ह्या पदावर बसलेल्या व्यक्तीने सांभाळून वागले पाहिजे , त्यांच्या प्रत्येक कृतीचा संदेश जनमानसात जातो.
अंनिसचे कृष्णा चांदगुडे यांनी काय म्हटलं आहे?
“मुख्यमंत्री आज शिर्डी दौऱ्यावर आले असतांना मिरगांव ( सिन्नर) येथील एका ज्योतिषाकडे भविष्य पाहण्यासाठी गेल्याचे समजते आहे. ते खरे असल्यास ही अत्यंत बेजबाबदार कृती आहे. पुरोगामी महाराष्ट्रात संवैधानिक पदावर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचा जाहिर निषेध महाराष्ट्र अंनिस करत आहे. ज्योतिष हे शास्त्र नसून थोतांड आहे. कुणी ते शास्त्र असल्याचे सिद्ध केल्यास आम्ही एकवीस लाखाचे बक्षीस ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वर्तनातून चुकीचा संदेश गेला आहे”
सत्यसाईबाबांच्या पाया पडणाऱ्या विलासरावांच्या हस्ते पुरस्कार घेणं नरेंद्र दाभोलकरांनी नाकारलं होतं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी भविष्य पाहिल्याची चर्चा होते आहे त्यानंतर अनेकांना नरेंद्र दाभोलकर यांची आठवण झाली आहे. विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सत्यसाईबाबा लातूरमध्ये येणार होते. विलासराव देशमुख सत्यसाईबाबांचे भक्त होते. सत्यसाईबाबा लातूर मध्ये येणार हे कळल्यावर तिथल्या अंनिसच्या कार्यकर्त्यांनी मोठी चळवळ उभारली होती. मात्र सत्यसाईबाबा यायच्या दोन दिवस आधी लातूर आणि शेजारील जिल्ह्यातल्या अंनिस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. विलासरावांच्या उपस्थितीत सत्यसाईबाबांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी विलासराव देशमुख हे त्यांच्या पाया पडले. ही बाब अंनिसचे प्रमुख नरेंद्र दाभोलकर यांना खटकली होती.
हे प्रकरण घडल्यानंतर काही दिवसातच महाराष्ट्र शासनाने नरेंद्र दाभोलकर यांच्या लढे अंधश्रद्धेचे या पुस्तकाला शासनाचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला आहे आणि त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुखांच्या हस्ते तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण मुंबईत यावं असं पत्र नरेंद्र दाभोलकर यांना लिहलं होतं.नरेंद्र दाभोलकर यांनी यावर एक खरमरीत पत्र लिहून हा पुरस्कार नाकारला होता.
नरेंद्र दाभोलकर यांनी त्यावेळी पत्रात विलासरावांना उद्देशून काय म्हटलं होतं?
विधानसभेचं अधिवेशन चालू असताना आपले सत्य साईबाबांच्या भेटीला जाणे, त्यांच्या पाया पडणे, रिकामा हात हवेत फिरवून त्यांनी आपल्याला दिलेल्या सोन्याच्या साखळीला जादूच्या चिल्लर चमत्काराऐवजी दैवी कृपाप्रसादाचा आविष्कार मानणे, आणि याबाबत शांततापूर्ण विरोध नोंदवण्याची इच्छा असलेल्या लातूर जिल्ह्यातील माझ्या सहकाऱ्यांना व आपल्या मतदारांना आधीच अटक करणे, या सर्व बाबी उघडपणे अंधश्रद्धेचे समर्थन करणाऱ्या आहेत.
अशा वेळी आपल्या हातून पुरस्कार स्वीकारणे म्हणजे पुस्तकात व्यक्त केलेल्या विचारासोबत प्रतारणा ठरेल असे मला वाटते. या नकारामुळे माझा पुरस्कार रद्द करण्यात आल्यास त्याबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही. मात्र बुवाबाजी आणि चमत्कार विरोधी स्पष्ट भूमिका आपण घेतल्यास त्यानंतर आपल्या हातून पुरस्कार स्वीकारण्यास मला आनंदच होईल.स्पष्ट लिहिल्याबद्दल माफी असावी असं पत्र नरेंद्र दाभोलकर यांनी लिहिलं होतं आणि पुरस्कार नाकारला होता.
ADVERTISEMENT