रोगापेक्षा ईलाज भयंकर अशी म्हण आपण नेहमीच ऐकतो. पण गुजरातमध्ये एका घटनेत याचा प्रत्यय आला आहे. गुजरातमध्ये किडनी स्टोनमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांची शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी किडनीच काढून घेतली. यामुळे रुग्णाला जीव गमवावा लागला. याप्रकरणी आता रुग्णालयाला मृताच्या वारसांना 11 लाखांची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.
ADVERTISEMENT
गुजरातमधील खेडा जिल्ह्यात असलेल्या वांघरोळी गावातील रहिवाशी देवेंद्रभाई रावल यांना पाठदुखीचा आणि लघवी करताना त्रास होत होता. मे 2011 मध्ये त्यांना हा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे त्यांनी रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला.
देवेंद्रभाई रावल हे बालानिसोर येथील केएमजी रुग्णालयात गेले. रुग्णालयात तपासणी करण्यात आल्यानंतर देवेंद्रभाई रावल यांच्या डाव्या किडनीत 15 एमएमचा स्टोन असल्याचं आढळून आलं. त्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास सांगितलं. रावल यांच्या 3 सप्टेंबर 2011 रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली.
दरम्यान, शस्त्रक्रियेमुळे डॉक्टरांनी रावल यांच्या कुटुंबियांना सांगितलं की, स्टोनऐवजी त्यांची डावी किडनी काढावी लागेल. रुग्णांचं हित लक्षात घेऊन हा निर्णय घेत असल्याचं डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितलं.
शस्त्रक्रिया होऊ अनेक महिने झाल्यानंतर देवेंद्रभाई रावल यांना लघवी करतानाचा त्रास कायम होता. त्यामुळे त्यांना नडियाद येथील एका किडनी स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना अहमदाबाद येथील किडनी संसर्ग आणि रिसर्च सेंटर येथे पाठवण्यात आलं. तिथेच त्यांचा 8 जानेवारी 2012 रोजी मृत्यू झाला.
याप्रकरणी रुग्णालयाकडून झालेल्या प्रकाराविरोधात कुटुंबियांनी राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार केली. नातेवाईकांनी दाखल केलेल्या तक्रारीवर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने केएमजी जनरल रुग्णालय प्रशासनाला मृताच्या वारसांना नुकसान भरपाईपोटी 11.23 लाख रुपये देण्याचे आदेश दिले. मृत्यूला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हे झाल्याचं आयोगाने नमूद केलं.
ADVERTISEMENT