शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमीत्त व्हर्च्युअल भाषणात बोलत असताना मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचाही उद्धव ठाकरेंनी या भाषणात समाचार घेतला.
ADVERTISEMENT
कोरोनाच्या काळात आजही अनेक पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत. स्वबळावर लढणं हा शिवसेनेचाही हक्क आहे. पण हे स्वबळ फक्त निवडणुकांपूरत असू नये. हे स्वबळ स्वाभिमानाचं आणि अभिमानाचं असावं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला टोला लगावला. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर कार्यक्रमात काँग्रेस स्वबळावर लढेल असं वक्तव्य केलं होतं.
महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला कमी महत्व मिळत असल्यामुळे नेत्यांची नाराजी गेल्या काही दिवसांमध्ये समोर आली होती. त्यामुळे काँग्रेसच्या या स्वबळाच्या नाऱ्याचा मुख्यमंत्र्यांनी आजच्या भाषणात समाचार घेतला. “सध्याच्या परिस्थितीत संकुचित राजकारण केल्यास त्याचा कोणालाही फायदा होणार नाही. काहीजणांना आपण स्वबळावर लढू आणि सरकारला अडचणीत आणू असं वाटत असेल तर ते होणार नाही. आता लोकांसमोर स्वबळाची भाषा करायला गेलात तर ते चपलेने मारतील. सत्ता आणि स्वबळ बाजूला ठेवत सध्या सर्वांनी कोरोनाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात सांगितलं.
यावेळी भाषणात उद्धव ठाकरेंनी भाजपलाही चिमटा काढला. “सत्ता गेल्यामुळे काहींच्या पोटात दुखतंय, मुरडा आलाय. पण त्यावर उपचार करण्यासाठी मी काही डॉक्टर नाही. गेली ५५ वर्ष शिवसेना प्रत्येक पक्षाचे रंग आणि अंतरंग पाहून मोठी झाली आहे. अनेक जणांना शिवसेनेच्या हिंदुत्वाची चिंता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्यानंतर आम्ही हिंदुत्व सोडलं अशी टीका होते आहे. पण हिंदुत्व हे कोणाचंही पेटंट नाही. तो काही कपड्याचा भाग नाही की नेसला आणि सोडून दिला. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. त्यामुळे कोणालाही आमच्या हिंदुत्वाची चिंता करण्याची गरज नाही”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपलाही टोला लगावला.
ADVERTISEMENT