पुणे: कोरोनाविरोधात (Corona) लढा देण्यासाठी जगभरातील डॉक्टर (Doctor) आणि आरोग्य कर्मचारी आघाडीवर आहेत. कर्तव्य बजावताना बर्याच जणांना संसर्ग देखील झाला आहे. तर त्यांच्यातील काही जणांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनामध्ये गमावले देखील आहे. तरीही आज ते आपलं कर्तव्य इमानेइतबारे बजावत आहेत.
ADVERTISEMENT
पुण्याच्या (Pune) संजीवन रूग्णालयाच्या अशाच एका घटनेत डॉ. मुकुंद पेनूरकर यांनी 2 एप्रिल रोजी वडिलांना कोरोनामध्ये गमावले. जेव्हा डॉ. मुकुंद पेनूरकरांच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली तेव्हा डॉ. मुकुंद रुग्णालयात दुसऱ्याला रुग्णालयात तपासत होते. जेव्हा त्यांना त्यांच्या वडिलांची प्रकृती अधिक बिघडली असल्याची माहिती मिळाली तेव्हा ते धावत ICU वार्डमधे पोचले पण ते त्यांच्या वडिलांना मात्र वाचवू शकले नाही. यावेळी डॉक्टर पेनूरकर यांना आपल्या वडिलांना वाचवता न आल्याचं अतोनात दु:ख झालं.
माणूसकी महत्वाची! गावकऱ्यांनी जबाबदारी नाकारली, सांगलीत मुस्लीम बांधवांनी हिंदू महिलेवर केले अंत्यसंस्कार
दुसरीकडे डॉक्टर पेनूरकर यांचे भाऊ आणि आई यांना देखील यावेळी कोरोनाची लागण झाली आहे. त्या दोघांवर देखील सध्या उपचार सुरु आहे. अशावेळी कठीण परिस्थितीत देखील डॉक्टर पेनूरकर यांनी कोरोना रुग्णांसाठी काम करणं सुरूच ठेवलं आहे.
डॉ. पेनूरकर यांनी पुण्यातील संजीवन रूग्णालयात स्वत:च्या वडील, आई आणि भावाला दाखल केलं होतं. कारण याच रुग्णलयात ते स्वत: इतर रूग्णांवर उपचार करीत होते. बाहेरची परिस्थिती चांगली नाही म्हणून त्यांनी त्यांच्या वडिलांना स्वतःच्या रूग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. पण दुर्दैवाने त्यांना आपल्या वडिलांना गमावावं लागलं. डॉ. पेनूरकर यांचे भाऊ आणि आई यांच्यावर अजूनही उपचार सुरु आहेत आणि हे या दोघांचीही प्रकृती आता सुधारत आहे.
…म्हणून ‘या’ ढाबा मालकाची आज संपूर्ण जिल्ह्यात सुरु आहे चर्चा!
डॉ. पेनूरकर कोरोनाबधित रूग्णांसाठी बर्याच दिवसांपासून काम करत आहे. त्यामुळे सर्व परिस्थितीची त्यांना नेमकी जाणीव आहे. त्यामुळे वडिलांच्या निधनानंतर अवघ्या एका दिवसाची सुट्टी घेऊन ते आपल्या कर्तव्यावर परत आले. ‘मला वाटते की, रूग्णांची सेवा करणे ही माझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे.’ असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. या संकटात त्यांनी त्यांच्या वडिलांना गमावलं पण समाजाची सेवा करणे ही सध्याची आमची प्राथमिकता असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं.
‘परिस्थिती अशी आहे की, कुटुंबातील सदस्यसुद्धा आपल्या प्रियजनांना भेटू शकत नाहीत. आपण एका कठीण काळातून जात आहोत आणि यावर विजय मिळविण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करण्याची गरज आहे.’ असंही डॉ. पेनूरकर यावेळी म्हणाले.
कोरोनाचे संकट गहिरे झालेले असताना त्यातून डॉ. पेनूरकर यांच्यासारखे कोरोना योद्धेच आपल्याला वाचवू शकतात. वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत डॉ. पेनूरकरांची ही कृती त्यांच्यातील धन्वंतरीची जाणीव करून देते असंच म्हणायला हवं.
ADVERTISEMENT