नागपूरमध्ये पोहण्यासाठी नदीत उतरलेले पाच युवक बुडाल्याची घटना घडली आहे. रविवार असल्यानं युवक कन्हान नदीवर गेले होते. अंघोळ करण्यासाठी ते पात्रात उतरले मात्र, पाण्याचा अंदाज न घेता खोल पाण्यात गेले. त्यानंतर पाचही युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचा शोध घेतला जात आहे.
ADVERTISEMENT
नदीत बुडालेले युवक यवतमाळ जिल्ह्यातील असून, ही घटना नागपूर जिल्ह्यात घडली आहे. मृत युवक यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील रहिवासी आहेत. सय्यद अरबाज (वय २१), ख्वाजा बेग (वय १९), सत्पहीन शेख (वय २०), अय्याज बेग (वय २२) व मोहम्मद आखुजर (वय २१) अशी बुडालेल्या तरुणांची नावं आहेत.
रविवारी सकाळी तरुण नागपूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या कन्हान नदीत पोहण्यासाठी आले होते. नागपूर जिल्ह्यात दर्गी जुनी कामठी (ता. पारशिवनी) येथे ते कन्हान नदी पात्रात अंघोळीसाठी उतरले. पोहण्याच्या नादात पाचही युवक खोल पाण्यात गेले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाचही युवक अचानक बुडाले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. युवकांच्या शोध घेण्यासाठी बचाव कार्य हाती घेतलं. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं अडथळे येत आहेत. दुपारी बारा वाजेर्यंत युवकांचा शोध घेण्यात यश आलेलं नाही. ‘कुणाचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला नाही. शोधकार्य सुरूच आहे’, अशी माहिती कन्हान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी दिली.
पाऊस झाल्यानं पात्रातील पाण्याचा प्रवाह वाढला
मागील दोन ते तीन दिवसात विदर्भात चांगला पाऊस झाला. यामुळे नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. त्यामुळे युवकांचा शोध घेण्यात पाण्याच्या प्रवाहाचा अडथळ येत आहे. मदतकार्यातील अडथळा लक्षात घेऊन पारशिवणीच्या तहसीलदारांनी SDRF च्या पथकाची मागणी केली.
घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे अवर सचिव फडतरे यांनी राज्य आपत्ती दलाकडे SDRF चं पथक पाठवण्याची मागणी केली आहे. अत्यावश्यक साधनसामग्रीसह तातडीने एक SDRF पथक घटनास्थळी पाठवण्यात यावं, असं अवर सचिवांनी आपल्या पत्रात म्हटलेलं आहे.
ADVERTISEMENT