प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक
ADVERTISEMENT
अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून 94 वं अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिकमध्ये सुरू झालं आहे. मात्र या साहित्य संमेलनाच्या उद्घघाटनाच्या दिवशी संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर हे प्रकृतीच्या कारणामुळे हजर राहू शकले नाहीत. याआधी उस्मानाबादमध्ये जे संमेलन झालं होतं त्यावेळीही फ्रान्सिस दिब्रेटो यांची तब्बेत बिघडली होती. ते संमेलनाला आले होते पण तीन तासात परत गेले. या सगळ्या पार्श्वभूमीवर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठालेपाटील यांनी एक भूमिका मांडली की संमेलानाध्यक्ष हिंडता फिरता असला पाहिजे. त्याला आता लेखक उत्तम कांबळे यांनी उत्तर दिलं आहे.
94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात पावसाचा खोडा, कोव्हिड ते ओमिक्रॉन वाचा काय आले अडथळे?
काय म्हणाले आहेत उत्तम कांबळे?
साहित्य संमेलनात तरूणाईला वाव दिला पाहिजे याविषयी कुणाचंही दुमत नाही. मात्र या ठिकाणी अध्यक्षपदाचा विषय हा संपूर्णतः ज्ञानाशी, साहित्यातल्या योगदानाशी संबंधित आहे. तरूणांना संधी द्यायची म्हणजे काय? आधार कार्ड काढलं की अध्यक्ष करायचं, पॅनकार्ड काढलं की कविता वाचायला द्यायची असं आहे का? असे प्रश्न उपस्थित करत उत्तम कांबळे यांनी कौतिकराव ठाले पाटील यांच्या भूमिका खोडून काढली आहे. केवळ तरूण किंवा केवळ वृद्ध हा आधार नसतो. जो ज्येष्ठ असो किंवा तरूण असो त्याचा व्यासंग मोठा असेल तर त्याचा सन्मान झाला पाहिजे. तुमची पात्रता काय? तुम्हाला चालता बोलता साहित्यिक हवा, ज्ञानी हवा की कर्तृत्ववान हवा हे ठरवावं लागेल असंही उत्तम कांबळे यांनी सुनावलं आहे.
काय म्हणाले श्रीधर पाटील?
यापूर्वी साहित्यिक होते जे ज्येष्ठ होते ते निवडणुकीच्या प्रकारात भाग घेत नव्हते. साहित्यिकाने निवडून कशाला यायला पाहिजे? सन्माने त्याची निवड झाली पाहिजे. सन्मानाने हे सगळं केलं गेलं पाहिजे तिथे वय हा मुद्दा बाजूला ठेवला पाहिजे. विद्वत्ता आणि साहित्य क्षेत्रातलं योगदान हे दोन मुद्दे विचारात घेतले पाहिजेत तिथे वयाचा मुद्दा महत्त्वाचा नाही असं मला वाटतं. आजही जयंत नारळीकर यांचं सुंदर भाषण आपण ऐकलं तशीच भूमिका फादर फ्रान्सिस दिब्रेटोंच्या बाबतीत घेता आली असती. कुणालाही दोष देण्यात अर्थ नाही. विज्ञान कथेचा अध्यक्ष नेमतो आणि ऑनलाईन जाऊ शकत नाही यापेक्षा मोठा विनोद नाही असं मला वाटतं असंही श्रीनिवास पाटील म्हणाले.
विश्वास पाटील काय म्हणाले?
जयंत नारळीकर यांच्या प्रकृतीविषयी अडचण आहे हे मला ठाऊक आहे. त्यामुळे ते येऊ शकले नाहीत ते कारण मान्य करता येण्यासारखं आहे. मात्र ठालेपाटील यांनी जो मुद्दा मांडला त्याच्य़ाशी मी सहमत आहे. हिंडता-फिरता माणूस अध्यक्ष असला पाहिजे असं मलाही वाटतं. तसंच तरूणाईला संधी दिली तरी काय हरकत आहे? असंही मत लेखक विश्वास पाटील यांनी व्यक्त केलं.
काय म्हणाले होते कौतिकराव ठाले पाटील?
साहित्य महामंडळाने तीन वर्षांपूर्वी अध्यक्ष निवडीसाठी आपली घटना बदलली. घटना बदलल्यानंतर जे साहित्य संमेलन पार पडलं त्यात विघ्नं आली होती पण ती अध्यक्षांमुळे नव्हती आली. घटना बदलल्यानंतर दुसरं साहित्य संमेलन उस्मानाबाद आणि तिसरं नाशिकला पार पडतंय. साहित्य महामंडळाने जे अध्यक्ष निवडले त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे साहित्य संमेलनं अडचणीत आली होती हे मान्य केलं पाहिजे. उस्मानाबादच्या साहित्य संमेलनासाठी ज्येष्ठ ख्रिस्ती लेखक फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांची निवड साहित्य महामंडळाने केली होती. त्यांचे अनेक साहित्य संस्थांमध्ये अनेक सत्कारही झाले होते. सत्कार होईपर्यंत त्यांची प्रकृती उत्तम होती. साहित्य संमेलन दोन दिवसांवर आलं आणि त्यांच्या पाठीच्या कण्याच्या मणक्यांमध्ये अंतर पडलं. त्यामुळे त्यांना वेदना होऊ लागल्या. डॉक्टरांनी त्यांना साहित्य संमेलनात जाण्यासाठी त्यांना मनाई करण्यात केली होती. तरीही ते उस्माबानाबाद या ठिकाणी सेकंड एसीच्या रेल्वेने पोहचले. या डब्यातून त्यांना उतरताही येत नव्हतं. त्यावेळी त्यांच्या या डब्यात असणाऱ्या आमदारांनी त्यांना व्हीलचेअरवर बसवलं, ट्रेनमधून उतरवलं आणि मग ते संमेलनाच्या ठिकाणी आले.
संमेलनाच्या ठिकाणी येऊन फ्रान्सिस दिब्रेटो यांनी आपले विचार मांडले. वेदना होत असूनही ते कार्यक्रमाचा खोळंबा नको, साहित्य महामंडळाने जो काही खर्च केला आहे तो त्यांनी लक्षात घेतला. त्या सगळ्याच्या जाणीवेतून ते आले होते. असं सांगत त्यांनी फ्रान्सिस दिब्रेटो यांचं उदाहरण दिलं. जयंत नारळीकर यांच्यावर टीका करायची नाही मात्र पुढच्या वेळी साहित्य महामंडळाने हिंडता फिरता माणूस संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडला पाहिजे असं म्हटलं होतं त्यावर आता प्रतिक्रिया येत आहेत.
ADVERTISEMENT