राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्याच्या घडीला निधीवाटप आणि मतदारसंघाच्या वर्चस्ववादातून रस्सीखेच सुरु आहे. आगामी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना नेत्यांनी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना माघार घ्यायला लावत मतदारसंघ काँग्रेसला सोडला. ज्यामुळे राजेश क्षीरसागर हे नाराज झाले आहेत. ज्यांनी आपल्याला पाडलं त्यांनाच हा मतदारसंघ द्यावा लागतो हे दुर्दैव असल्याचं क्षीरसागर यांनी बोलून दाखवलं. हा प्रकार ताजा असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही शिवसेनेला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी फेसबूक पोस्ट लिहीत मावळ मतदारसंघ शिवसेनेने पार्थ पवारांना देऊन विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंना राज्यसभेत पाठवावं अशी मागणी केली आहे.
नितीन देशमुख यांच्या या फेसबूक पोस्टमुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आपल्या फेसबूक पोस्टमध्ये नितीन देशमुखांनी, महाविकास आघाडीने ठरविल्याप्रमाणे पुढील निवडणूक आघाडी लढणार आहे. त्यामुळे मावळची जागा ही पार्थ अजित पवार यांना देऊन बारणे यांना महाविकास आघाडीने राज्यसभेत पाठवावे. २००५ मध्ये जेव्हा सुप्रीया सुळे या राज्यसभेसाठी उभ्या राहिल्या होत्या, तेव्हा हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेबांनी सुप्रियाताईंना बिनशर्त पाठिंबा दिला होता. आज तोच दिलदारपणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी दाखवावा अशी मागणी केली आहे.
पार्थ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तिकीटं दिलं होतं. मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ पवार यांच्यामागे मोठी ताकद उभी केली होती. खुद्द शरद पवार यांच्यासह अजित पवार आणि अन्य नेत्यांनी पार्थ पवारांसाठी प्रचारसभा घेतली. परंतू शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी बाजी मारत मतदारसंघ कायम राखला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्याने केलेल्या मागणीवर आता महाविकास आघाडीतून काय प्रतिक्रीया उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT