केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क अनिवार्य केल्याने आजापूसन 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचीच विक्री होणार आहे. गोल्ड हॉलमार्किंग हे आता केंद्र सरकारने अनिवार्य केलं आहे. त्यामुळे जर सोनं खरेदी करायचं असेल तर आजपासून तुम्हाला Hallmark असलेलं सोनंच मिळणार आहे. हॉलमार्क सोन्याचं वैशिष्ट्य हे असतं की यावर सोनं किती कॅरेटचं आहे त्याचाही उल्लेख असतो. याशिवाय दागिन्यांमध्ये किती टक्के सोनं असतं त्याचाही उल्लेख करण्यात येतो आहे.
ADVERTISEMENT
आजपासून हॉलमार्क नसलेले दागिने विकणे किंवा विनापरवाना सोन्याचे दागिने विकणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. BISच्या नियमांनुसार परवान्याशिवाय सोन्याचे दागिने विकणे किंवा नॉन हॉलमार्क दागिने विकणाऱ्या सरफांविरोधात मालाची जप्ती, पाच लाखांपर्यंत दंड आणि तुरूंगवास यांची तरतूद करण्यात आली आहे.
Gold Hallmark म्हणजे काय?
गोल्ड हॉलमार्क म्हणजे नेमकं काय हा प्रश्न आपल्याला पडला असेलच. याचं उत्तर आहे ते म्हणजे हॉलमार्क हे सोन्याच्या शुद्धतेचं मानक मानलं जातं. या अंतर्गत प्रत्येक दागिन्यावर किंवा कलाकृती भारतीय मानक ब्युरो अर्थात BIS आपल्या मार्कद्वारे शुद्धतेची ग्वाही देतं. सरकारने जारी केलेल्या आदेशांनुसार सर्व सराफांना सोन्याचे दागिने किंवा इतर कोणत्याही कलाकृती विकण्यासाठी हे मानक पूर्ण करावं लागणार आहे. हॉलमार्क हा देशात आजपासून (15 जून) अनिवार्य झाला आहे त्यामुळे आता 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचीच विक्री होऊ शकणार आहे.
प्रत्येक कॅरेटच्या सोन्यासाठी हॉलमार्कचे नंबर निश्चित केले जातात. सराफांकडून 22 कॅरेटसाठी 916 या क्रमांकाचा वापर केला जातो. 18 कॅरेटसाठी 750 हा क्रमांक आणि 14 कॅरेटसाठी 585 हा क्रमांक वापरला जातो.
हॉलमार्कचा ग्राहकांना कसा होणार फायदा?
सोन्याच्या दागिन्यांमध्ये किती टक्के सोनं आणि किती टक्के इतर धातूचा वापर केला गेला आहे हे हॉलमार्कला दिलेल्या क्रमांकावरून लक्षात येतं. यावरून हॉलमार्किंग म्हणजेच सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर दिलेली खात्री आहे असंही आपण म्हणू शकतो. याचा ग्राहकांना होणारा फायदा हा की आपण किती शुद्धतेचं सोनं खरेदी करतो आहे हे त्यांना सोन खरेदी करतानाच कळणार आहे त्यांची याबाबत फसवणूक होऊ शकणार नाही.
तुमच्या दागिन्याच्या हॉलमार्कवर 916 हा क्रमांक असेल तर तुमच्या दागिन्यामध्ये 91.6 टक्के सोनं आहे. 585 हा क्रमांक असेल तर 58.5 टक्के शुद्ध सोनं वापरण्यात आलं आहे आणि 750 असं लिहिलं असेल तर 75 टक्के शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला आहे हे समाजावं. हे सोन्याचं प्रमाण किती आहे हे ठरवण्याचे मानक आहेत.
ADVERTISEMENT