मुंबई: देशभरात आज (30 ऑगस्ट) कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जात आहे. भगवान कृष्णाचा जन्म जन्माष्टमीच्या दिवशी झाला होता. जो भगवान विष्णूचा 8 वा अवतार मानला जातो. त्यामुळेच जन्माष्टमीनिमित्त देशभरात अनेक मंदिरांमध्ये कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. दरम्यान, कोरोना संकटामुळे यंदाही दहीहंडी कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, असं असलं तरी देशभरातील अनेक मंदिरं ही सुशोभित करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मात्र, कोरोना संकटामुळे मंदिरे ही अद्यापही सुरु करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे भाविकांना मंदिरामध्ये जाऊन पूजा-अर्चा करता येणार नाही.
यावर्षी श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी द्वापर युगासारखा योग आल्याचं ज्योतिष तज्ज्ञांचं म्हणणं आहे. श्री कृष्णाचा जन्म भद्रा कृष्ण अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्र आणि वृषभ राशीत झाला होती. यावर्षीही असाच एक योग जन्माष्टमीच्या दिवशी होत आहे. यावर्षी जन्माष्टमीचा सण आज (सोमवार 30 ऑगस्ट) रोजी साजरा केला जात आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये मंदिरं सुरु करण्यात आली असून मथुरेतील प्रसिद्ध राधा-कृष्ण मंदिरात सकाळपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, श्रीकृष्ण जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘आपणा सर्वांना जन्माष्टमीच्या अनेक शुभेच्छा. जय श्रीकृष्ण!’
याचवेळी गृहमंत्री अमित शहा यांनी देखील जन्माष्टमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ‘श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पवित्र सणाच्या निमित्ताने सर्व देशवासियांना शुभेच्छा. जय श्रीकृष्ण!’
महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव नाहीच!
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाल्यानं दहीहंडी आयोजनास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी काही दिवसांपासून केली जात होती. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील विविध दहीहंडी गोविंदा पथकांकडून आणि दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांकडून ही मागणी केली जात होती. मात्र, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे यंदा दहीहंडी साजरी न करण्याचाचा निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने घेतला होता.
‘टास्क फोर्सने सांगितलं आहे की, दीड महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येईल. ट्रेन सुरू करण्यात आल्या जेणेकरुन राज्याची आर्थिक स्थिती सुधारता येईल. सोशल डिस्टन्सिंग राखून दहीहंडी करता येणार नाही; मात्र त्या जागेवर पूजा करता येईल. आपापल्या दहीहंडी मंडळाच्या जागेवर पूजा करा, मात्र थर लावता येणार नाही’, असं मुख्यमंत्री म्हणाल्याचं दहीहंडी समन्वय समितीच्या सचिव गीता झगडे यांनी सांगितलं होतं.
दहीहंडी उत्सवाबाबत बोलताना मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
‘आपल्या सगळ्यांच्या भावना एकसारख्याच आहेत. आपले सण आपण जपलेच पाहिजेत; पण, आता प्रश्न आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचार करण्यालाच प्राधान्य द्यावं लागेल.’
‘आम्ही असा निर्णय घेताना अनेकजण आंदोलन करणार असल्याचं जाहीर करतात. मग, आंदोलन करायचं असेल तर कोरोना विरोधात करा ना’, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत अप्रत्यक्षपणे विरोधकांना टोला लगावला होता.
‘दुसऱ्या लाटेतून आपण डॉक्टरांच्या मेहनतीमुळे बाहेर पडलो आहोत. आता जी विंडो आपल्याला मिळाली आहे. तिचा वापर आपण थोडं अर्थचक्र सावरण्यासाठी करूया. पुन्हा ती काळरात्र नको; जनतेचे प्राण वाचवण्यासाठी आपण आपली संस्कृती परंपरा देखील काहीवेळ बाजूला ठेवून समजूतीने गर्दी टाळण्यासाठी आपल्याला सुरक्षेचं पाऊल उचलावं लागेल’, अशी समजंस्य भूमिका मुख्यमंत्र्यांनी बैठकीत मांडली होती.
ADVERTISEMENT