छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं अराध्य दैवत आहे. त्यांच्या आयुष्यावर सिनेमा येणं ही चांगलीच बाब आहे मात्र इतिहासाची मोडतोड झाल्यास गप्प बसणार नाही असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. हर हर महादेव हा झी स्टुडिओचा सिनेमा दिवाळीत रिलिज झाला. यामध्ये सुबोध भावेने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर शरद केळकर या अभिनेत्याने बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे. दुसरीकडे नुकतीच महेश मांजरेकर यांनी वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमाची घोषणा केली आहे. याबाबतच संभाजीराजेंनी आक्षेप घेतला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे संभाजीराजेंनी?
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. त्यामुळे त्यावर कुणी सिनेमा करणार असेल तर ती कौतुकाचीच बाब म्हटली पाहिजे. राजस्थानचे महाराणा प्रताप घराणं सोडलं तर अनेक ऐतिहासिक सिनेमा आले आहेत. असे काही सिनेमा इतिहासाची मोडतोड करून काढले जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अशीच इतिहासाची मोडतोड करून सिनेमा काढले गेले तर आम्ही अजिबात सहन करणार नाही असं संभाजीराजेंनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड
सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड केली जाते आणि सिनेमात सादर केलं जातं. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिनेमांबाबत आणि मावळ्यांबाबत आम्ही हे मुळीच सहन करणार नाही असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. इतिहासाचा विपर्यास केला जातो आहे. असे सिनेमा लोकांपुढे कसे घेऊन जायचे? शिवाजी महाराज, त्यांचे मावळे ही आपली प्रेरणा आहे. त्यात सिनेमॅटिक लिबर्टी कशी चालेल? इतिहासाचा गाभा का सोडत आहेत? असेही प्रश्न संभाजीराजेंनी विचारलं आहे.
भालजी पेंढारकारांचा आदर्श घ्या
भालजी पेंढारकरांनीही छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा काढले ना. त्यांच्यावर कुणी आक्षेप घेतला का? हर हर महादेव सिनेमात चुकीचा इतिहास दाखवला गेला आहे. तर वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमात जे मावळे आणि छत्रपतींचे शिवराय दाखवण्यात आले ते काय मावळे आहेत का? पोस्टवरून ते मावळे वाटतात का? पगडी काढलेली दाखवण्यात आली आहे तो शोकसंदेश असतो. हा आपला इतिहास आहे. मी सगळ्या निर्मात्यांना दिग्दर्शकांना सांगू इच्छितो असे सिनेमा काढले तर गाठ संभाजीराजेंशी आहे. भालजी पेंढारकरांचा थोडा आदर्श या सिनेमा बनवणाऱ्यांनी घ्यावा. चुकीचे सिनेमा आणलेत तर मी तुम्हाला आडवा येणारच हे लक्षात ठेवा.
माझी सरकारला विनंती आहे की असे सिनेमा तयार होणार असतील तर सरकारने इतिहास तज्ज्ञांची समिती नेमावी. माझी सगळ्या इतिहासकारांना आणि अभ्यासकांना विनंती आहे की त्यांनीही या मध्ये लक्ष घालावं. सरकारने यामध्ये लक्ष द्यावं नाहीतर गाठ माझ्याशी आहे हे कुणी विसरू नये असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT