राज्यात आज आणि उद्या (25 आणि 26 सप्टेंबर) आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाच्या परीक्षा होऊ घातलेल्या होत्या. मात्र, त्या ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्या. या परीक्षा न्यासा या संस्थेमार्फत घेतल्या जाणार होत्या. मात्र, न्यासाच्या अकार्यक्षमतेमुळे पुढे ढकलण्यात येत आहे, असं सांगत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा पुढे ढकलण्याला न्यासाची अकार्यक्षमता कारणीभूत असल्याचं स्पष्टीकरण दिलं.
ADVERTISEMENT
राज्याच्या आरोग्य विभागातील गट क व गट ड मधील विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यासाठी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. २५ व २६ सप्टेंबर रोजी परीक्षा घेतली जाणार होती. मात्र, परीक्षेला काही तासांचा वेळ शिल्लक असताना म्हणजेच २४ सप्टेंबर रोजी रात्री परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्य सरकारच्या या निर्णयानंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. त्यावर राजेश टोपे यांनी परीक्षा रद्द करण्याच्या कारणाचा खुलासा केला. ‘आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झालेली नाही, तर पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या जागा कोणत्याही परिस्थिती भरणारच आहे. कंपनीने असमर्थता दाखविल्यामुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढावली. पण विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. मी विद्यार्थ्यांची माफी मागतो. पण विद्यार्थ्यांनी काळजी करु नये. येत्या काहीच दिवसांत परीक्षेच्या तारखेची घोषणा केली जाईल’, असं टोपे म्हणाले.
‘न्यासाच्या अकार्यक्षमतेमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. २६ तारखेला ६ हजार ९०० जागा भरण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. यात गट क आणि ड या प्रवर्गातील सर्व जागा सरळ भरतीने भरल्या जातात. लेखी परीक्षा घेण्याच्या अनुषंगाने काही सूचना आहेत. आरोग्य विभागाच्या भरतीसाठी न्यासाची निवड करण्यात आली होती. न्यासासोबत करार करण्यात आला. त्या करारातच स्पष्ट करण्यात आलं होतं की, प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारीच फक्त आरोग्य विभागावर असेल. तर प्रश्नपत्रिकांची छपाई, परीक्षा केंद्रावर पोहोचवणे, हॉल तिकीट तयार करणे, राज्यभरात परीक्षा केंद्र तयार करणं, परीक्षार्थींची व्यवस्था करणे या सर्व जबाबदाऱ्या न्यासावर आहेत’, असं टोपे म्हणाले.
‘कंपनीने असमर्थता दाखवली, त्यामुळे परीक्षा रद्द करण्याशिवाय पर्याय नव्हता. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्याशी रात्री उशिरापर्यंत चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांशी झालेल्या त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आरोग्य विभागाशी संबंधित जरी थेट हा विषय नसला, तरी आयटी विभागाने दाखवलेल्या असमर्थतेमुळे ही वेळ आली. पण परीक्षा रद्द झालेली नाही, परीक्षा नियोजित पद्धतीने होणार आहे. न्यासा कंपनीने असमर्थता दाखवली. या कंपनीने आता दहा दिवसांचा वेळ मागितला आहे, त्यामुळे ही परीक्षा होणारच आहे, ठरलेल्या जागा भरल्या जाणार आहेत, असं टोपे म्हणाले.
ADVERTISEMENT