Khargone Violence: अफवेने घात केला, गुण्या-गोविंदाने नांदणारे हिंदू-मुस्लीम आपापसांत भिडले

मुंबई तक

• 10:17 AM • 15 Apr 2022

रामनवमी च्या सणाला मध्य प्रदेशातील खारगोन शहरात तलाब चौक भागात यात्रेदरम्यान हिंसाचाराची घटना पहायला मिळाली. प्रत्येक वर्षी रघुवंशी समुदायाचे लोक रामनवमीला यात्रा काढतात. या यात्रेदरम्यान संवेदनशील भाग समजल्या जाणाऱ्या तलाब चौक परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतो. रामनवमीच्या यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी पोलीस मुस्लीम बहुल भागांमध्ये बॅरिकेटींग करतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रेतील सहभागी […]

Mumbaitak
follow google news

रामनवमी च्या सणाला मध्य प्रदेशातील खारगोन शहरात तलाब चौक भागात यात्रेदरम्यान हिंसाचाराची घटना पहायला मिळाली. प्रत्येक वर्षी रघुवंशी समुदायाचे लोक रामनवमीला यात्रा काढतात. या यात्रेदरम्यान संवेदनशील भाग समजल्या जाणाऱ्या तलाब चौक परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतो. रामनवमीच्या यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी पोलीस मुस्लीम बहुल भागांमध्ये बॅरिकेटींग करतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रेतील सहभागी सदस्य आणि पोलिसांमध्ये सुरुवातीला काही कारणावरुन जोरदार बाचाबाची झाली.

हे वाचलं का?

परंतू खरी समस्या तेव्हा सुरु झाली जेव्हा खारगोनमध्ये अफवा पसरली की पोलिसांनी रामनवमीची यात्रा तलब चौकात थांबवली. ज्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणात जमाव गोळा झाला. या अफवेनंतर याच भागातून आणखी एक रामनवमीची यात्रा यायला सुरुवात झाली. या दुसऱ्या यात्रेची वेळ ही नमाजाच्या वेळेसोबत एकत्र येत असल्यामुळे खरी वादाची ठिणगी पडली.

खारखोनमधील तलाब चौक ठरला – हिंसाचाराचं केंद्रबिंदू

रामनवमीच्या दुसऱ्या यात्रेत सहभागी झालेल्या सदस्यांनी केलेल्या आरोपांनुसार, नमाज पढून मशिदीबाहेर आलेल्या लोकांनी यात्रेतील सदस्यांना उद्युक्त केलं. “तिकडे खूप गर्दी जमा झाली होती. आम्ही यंदाच्या यात्रेसाठी तयारी केली होती. परंतू तलाब चौकात आमच्यावर दगडफेक झाली आणि त्यानंतर आम्हाला स्वतःचा बचाव करण्यासाठी पावलं उचलावी लागली”, दुसऱ्या यात्रेत सहभागी झालेल्या सदस्याने इंडिया टुडेशी बोलताना माहिती दिली.

दुसरीकडे तलाब चौकातील जामा मशिदीचे सचिव हाफीज मोहम्मद मोहसीन यांनी हे आरोप फेटाळले आहेत. दगडफेकीची घटना ही दोन्ही बाजूने झाल्याचं मोहसीन यांनी म्हटलं आहे. यात्रेतील लोकांनी आमच्या लोकांना उद्युक्त केल्याचं मोहसीन यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं. “आम्ही याआधीच स्थानिक प्रशासन आणि पंतप्रधान कार्यालयाला तलाब चौकचा परिसर हा संवेदनशील असल्याबाबत लिहीलं होतं. इथे हिंसाचाराच्या घटना वारंवार घडत असतात. मशिदीवर दगडफेक केली जाते, त्यामुळे कायदा-सुव्यवस्था टिकवून ठेवायची असेल तर यात्रांना परवानगी देण्यात येऊ नये”, असं मोहसीन यांनी स्थानिक प्रशासनाला पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं.

तलाब चौकातून हिंसाचारा वणव्यासारखा पसरला –

तलाब चौकातील परिस्थिती जेव्हा हाताबाहेर जायला लागली तेव्हा पोलिसांनी उपस्थित जमावावर लाठीचार्ज करुन अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. ज्यामुळे तावडी मोहल्ला, संजय नगर, गौशाला मार्ग, आनंद नगर, भावसार मोहल्ला आणि खसखसवाडी या सारख्या अरुंद गल्ल्यांमध्ये जमाव गोळा झाला. या हिंसाचारात जखमी झालेला 16 वर्षीय शिवम सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतो आहे.

“रामनवमीच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी आम्ही उत्सुक होतो. परंतू अचानक आमच्या मागून असलेल्या घरांमधून दगडफेकीला सुरुवात झाली. त्या लोकांकडे शस्त्रही होती.” या दंग्यांमध्ये जखमी झालेल्या शिवमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर इंदूर येथे उपचार सुरु आहेत.

हिंसाचाराच्या घटनेनंतर लोकांमध्ये तणाव, घरं विकण्याकडे स्थानिकांचा कल –

या घटनेनंतर मध्य प्रदेशात सध्या तणावाचं वातावरण आहे. भावसार मोहल्ला भागात राहणाऱ्या नीरज भावसारने आपण आपलं घर विकणार असल्याचं सांगितलं. वयाच्या तिसऱ्या वर्षी माझ्या घरावर असाच हल्ला झाला होता, तेव्हा माझ्या वडीलांनी आमचं घर वाचवलं होतं. यंदा झालेल्या हिंसाचाराच्या घटनेतही नीरजला आपल्या मुलाला सांभाळून घराचं रक्षण करावं लागलं. परंतू वारंवार होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनेमुळे आता नीरजला या भागात राहण्याची इच्छा राहिलेली नाही.

शिवमप्रमाणेच या भागात राहणाऱ्या नासिर अहमद यांच्या घरावरही दंगेखोरांनी हल्ला केला. महत्वाची गोष्ट म्हणजे नासिर अहमद यांच्या घरावर हल्ला करणारा व्यक्ती हा त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या शेजारच्या घरात राहणारा व्यक्तीच होता. “ज्यावेळी जमाव आमच्या भागाकडे सरकत होता तेव्हा मी माझा शेजारी अनिलला घरावर दगडफेक करताना पाहिलं. मी अनिलला हे देखील सांगितलं की आपण शेजारी आहोत आणि आपण असं वागायला नको. पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अनिलची बायकोही भागातली मुस्लीम घरं जाळण्याच्या सूचना देत होती. निवृत्त पोलीस उप-निरीक्षक असलेल्या नासिर अहमद हे आता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर प्रशासनाने खारगोन भागात संचारबंदी लावली. परंतू अफवेमुळे सुरु झालेला हिंसाचार थांबला नाही. संजय नगर भागात राहणाऱ्या इस्माईलने आपल्यावर ओढवलेली आपबिती सांगितली. “रात्री 1 वाजल्याच्या दरम्यान माझं किराणा मालाचं दुकान लोकांनी पेटवून दिलं. अनेक दुकानदारांनी संध्याकाळीच आपलं दुकान बंद केलं, आम्ही त्यांना विचारलं की आज लवकर दुकानं का बंद करत आहात, तेव्हा आम्हाला कोणीही याबद्दलची माहिती दिली नाही.” इस्माईल यांचं दुकान हिंदू बहुल वस्तीत असून 2018 पासून त्यांच्या दुकानावर हल्ला होण्याची ही दुसरी वेळ आहे.

सोमवारपासून स्थानिक प्रशासनाने खारगोन भागात हिंसाचाराच्या घटनेत सहभागी झालेल्या लोकांची घरं आणि दुकानं पाडण्यास सुरुवात केली. दोन दिवसांत स्थानिक प्रशासनाने 16 घरं आणि 32 दुकानं जमिनदोस्त केली. स्थानिक प्रशासन ही कारवाई अवैधपद्धतीने बांधकाम करण्यात आल्यामुळे करण्यात आल्याचं सांगत असलं तरीही प्रत्यक्षातली परिस्थिती वेगळी आहे.

दंगलीत सहभागी झालेल्या लोकांच्या घरावर आणि दुकानांवर ही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत साजीदचं घर जमीनदोस्त करण्यात आलं. इंडिया टुडेशी बोलत असताना साजिद म्हणाला, “2011 मध्ये मला माझ्या घराच्या सीमारेषेबद्दल कायदेशीर नोटीस आली होती. त्यानंतर मला कोणतीही नोटीस आलेली नाही. अचानक काही लोकं बुलडोजर घेऊन आली आणि माझं घर पाडायला सुरुवात केली. आम्ही त्या दंगलीत सहभागी झालो नव्हतो, आमच्या भागात कोणतीही दंगल झाली नाही.” खारगोन भागात अद्याप जमावबंदी लागू करण्यात आलेली असून काही प्रमाणात लोकांना सूट देण्यात आली आहे.

    follow whatsapp