ओडिसा : उडिया फिल्म इंडस्ट्रीतील स्टार कपलमधील वाद सध्या देशभरात गाजत आहे. या दोघांचही नातं एक न सुटलेलं कोडं बनलं आहे. काही दिवसांपूर्वी या स्टार कपलमधील वाद इतका टोकाला गेला होता की, न्यायालयालाही हस्तक्षेप करून सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप टाळण्यास सांगितलं होतं.
ADVERTISEMENT
नेमकं काय आहे प्रकरण?
अभिनेता आणि केंद्रपारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनुभव मोहंती आणि त्यांची पत्नी, प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा प्रियदर्शिनी यांच्यातील घटस्फोटाचा खटला सध्या न्यायालयात सुरु आहे. या सुनावणीदरम्यान दोघांनीही त्यांचं खाजगी आयुष्य चव्हाट्यावर आणलं आहे. 8 वर्षांपासून पत्नीने शारीरिक संबंध ठेऊ दिलेले नाहीत, असा आरोप मोहंती यांनी केला. तर वर्षा प्रियदर्शिनी यांनी मोहंती यांच्यावर घरगुती हिंसाचार आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला असून नुकसान भरपाई म्हणून 15 कोटी रुपयांची मागणी केली आहे.
अनुभव मोहंती आणि वर्षा प्रियदर्शिनी यांचा विवाह 2014 मध्ये झाला होता. लग्नानंतर काही वर्षे सारं काही आलबेल होतं, पण काहीच दिवसांत दोघांमधील नातं बिघडलं. या नात्यानं कौटुंबिक कलहाचे रूप धारण केलं आणि दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांचा फेरा सुरू झाला.
2020 मध्ये मोहंती यांनी दिल्ली न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. त्यावेळी दोघांच्या नात्याला वेगळं वळण मिळालं. मोहंती यांना पत्नी वर्षापासून वेगळं व्हायचं होतं. सुनावणीनंतर मार्च 2021 मध्ये न्यायालयानं केस ओडिसातील कटक न्यायालयात हलवली.
या दरम्यान मोहंती यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्नी वर्षा यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. 8 वर्षांपासून त्यांच्यात आणि वर्षामध्ये कोणतेही शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नव्हते, असा खळबळजनक दावा केला. मोहंती यांच्या मते, त्यांची पत्नी वर्षा शारीरिक संबंध ठेवू देत नव्हती आणि वैवाहिक जीवन जगू देत नव्हती.
मोहंती म्हणाले की, वर्षासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचे अनेक प्रयत्न करूनही माझी कायमच निराशा झाली. वर्षामुळे कौटुंबिक कलह निर्माण झाला असून याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनावर होत आहे.
मोहंती यांच्या या आरोपांनंतर वर्षा प्रियदर्शिनी यांनीही त्यांच्यावर गंभीर आरोप केले. 2020 मध्ये वर्षा यांनी मोहंतींविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली. मोहंती हे ड्रग्जच्या आहारी गेले असून त्यांचे अनेक महिलांशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची नुकसान भरपाई म्हणून 15 कोटी रुपयांची मागणी केली. एवढेच नाही तर घराचं भाडं आणि देखभालीसाठी 70 हजार रुपये दरमहा देण्याची मागणी केली.
एकीकडे दोघांचा खटला न्यायालयात सुरू असताना दुसरीकडे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होत्या. अशा परिस्थितीत, ओडिशा उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आणि मे 2022 मध्ये अनुभव मोहंती यांना घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान पत्नी वर्षा प्रियदर्शनी यांच्याविरुद्ध कोणताही व्हिडिओ पोस्ट करणे किंवा कोणत्याही मीडियावर टिप्पणी करणे टाळण्याचे आदेश दिले.
सध्याच्या घडीला कटक जिल्हा न्यायालयाने वर्षा प्रियदर्शिनी यांना पती अनुभव मोहंती यांचे घर रिकामे करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच न्यायालयाने मोहंती यांना पत्नी वर्षाला दरमहा 30 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देशही दिले आहेत.
ADVERTISEMENT