“राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गुंड माफियांचे आहे. त्यांचे ठेकेदार आणि शिष्य सामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे लोक आता त्यांच्या गैरव्यवहारांच्या तक्रारी माझ्याकडे घेऊन येत आहेत. गेल्या तीन दिवसांत आणखी तीन बड्या नेत्यांची प्रकरणे हाती आली आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच बाहेर काढणार आहे. कितीही धमक्या दिल्या तरी मी थांबणार नाही,” अशा शब्दांत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिलं आहे.
ADVERTISEMENT
सोमय्या यांनी आज नगर जिल्ह्यातील पारनेर येथील साखर कारखान्याला भेट दिली. या कारखान्याच्या विक्रीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार कारखाना बचाव समितीने त्यांच्याकडे केली होती. त्यानुसार सोमय्या पारनेरला आले होते. त्यांनी कारखान्याचे कामगार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. भाजपतर्फे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले
यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सोमय्यांनी आपली बाजू मांडली. “मी जे काम करतो, त्याला आरोप म्हणून नका. मी तपास यंत्रणांना माहिती आणि पुरावे देऊन पाठपुरावा करीत असतो. पारनेर कारखान्याच्या विक्रीतही संशयास्पद व्यवहार झाला आहे. त्यामुळे त्यानुसार त्याची चौकशी सुरू आहे. आता त्याला गती आली आहे,” असेही सोमय्या म्हणाले.
पूर्वी राष्ट्रवादीत असलेल्या व आता भाजपमध्ये आलेल्या काही नेत्यांच्या कारखान्याबद्दलही तक्रारी आहेत. त्यात लक्ष घालणार का? असे पत्रकारांनी विचारले असता सोमय्या म्हणाले, “माझ्याकडे कोणी तक्रार घेऊन आले तर मी त्याची माहिती घेतो. अभ्यास करतो. अधिक माहिती आणि पुरावे संकलित करून त्याचा पाठपुरावा करतो. सामान्य माणसाच्या बाजूने मी नेहमी उभा राहतो. पारनेर कारखान्याच्या बाबतीतही बचाव समिती मला येऊन भेटली. केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी लक्ष घालण्याची सूचना केली. त्यामुळे मी येथे आलो आहे. यामध्ये पक्षीय संबंध येत नाही. हे लोक आता माझ्याकडे आले. तुम्ही त्यावेळी का आला नाहीत, असे मी त्यांना म्हणू शकत नाही,” असे सोमय्या म्हणाले.
राज्य सहकारी बँक आणि साखर कारखान्यांची प्रकरणे सुरवातीला उघडकीस आणणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला मात्र सोमय्या यांनी सोयीस्कर बगल दिली.
कोल्हापूरमध्ये त्यांच्यावर झालेली कारवाईबद्दल पोलीस आणि राज्य सरकारवर सोमय्यांनी कडाडून टीका केली. ते म्हणाले की, “कोल्हापूर पोलिसांनी जी वागणूक दिली, त्याबद्दल मी मुंबईतील पोलीस तक्रार निवारण प्राधिकरणाकडे तक्रार करणार आहे. मला अंबाबाईचे दर्शन घेण्यापासून रोखलं गेलं, त्यामुळे पुढील आठवड्यात मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करणार आहे. ठाकरे, पवार हे दोन ठेकेदार आणि त्यांचे शिष्य एकत्र झाल्याने महाराष्टात हाहाकार माजला आहे. सामान्य माणूस त्यांच्याविरोधात तक्रार करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. मात्र, मी कोणाला घाबरणार नाही. कितीही धमक्या आल्या, कितीही वेळा अटक झाली, तरी माझे काम सुरूच ठेवणार आहे”, असेही सोमय्या म्हणाले.
त्यांच्याविरूद्ध दाखल दाव्यांसंबंधीही सोमय्यांनी भाष्य केलं. “माझ्याविरूद्ध एकूण साडेपाचशे कोटी रुपयांचे अब्रुनुकसानीचे दावे करण्यात आले आहेत. संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरूद्ध फक्त सव्वा रुपयाचा दावा दाखल करणार असल्याचे सांगून पाटील यांची किमत तेवढीच असल्याचे म्हटले आहे. असे असेल तर मग माझी किंमत साडेपाचशे कोटी होते. आमच्या प्रदेशाध्यापेक्षा माझी किंमत जास्त करून मला माझ्याच पक्षात अडचणीत आणता काय. संजय राऊत यांनी तक्रार झाल्यावर ५५ लाख रुपये परत केले. त्यामुळे ५५ लाख रुपयांची चोरी, हीच संजय राऊत यांची किंमत आहे”, असं म्हणत सोमय्यांनी राऊतांना टोला लगावला.
ADVERTISEMENT