मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरण हे बनावट होतं असा दावा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंविरोधात आरपारची लढाई लढत आहेत. ‘समीर वानखेडे यांनी खोटं जात प्रमाणपत्र जोडून केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळवली आहे. त्यामुळे मी ट्विटरवर त्यांच्यासंबंधी जे कागदपत्र शेअर केले आहेत ते जर खोटे निघाले तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईल, एवढंच नव्हे तर मी राजकारण देखील सोडून देईल.’ असं वक्तव्य नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.
ADVERTISEMENT
पाहा नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हटलंय
‘क्रांती रेडकर आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांना जीवे मारण्याच्या धमकी येत असतील तर माझं एकच म्हणणं आहे की, त्यांनी अमित शाह यांना भेटावं. तुम्हा लोकांना झेड सिक्युरिटीचा ताफा ते देऊ शकतात. जर फोनवरुन धमक्या येत असतील तर तपास झाला पाहिजे आणि सगळ्यांना 50-50 ब्लॅक कॅट कमांडो दिले पाहिजेत. अशी मी मागणी करतो.’
‘पण समीर वानखेडेंचा जन्माचा दाखला जो मी ट्विटरवर शेअर केला आहे तो जर खोटा ठरला तर मी राजकारणातून बाहेर जाईल, राजीनामा देईल. पण जर ते कागदपत्र खरे असतील तर समीर वानखेडेने किमान समोर येऊन क्षमा मागितली पाहिजे की, आमच्या कुटुंबीयांचा जो दावा आहे तो खोटा आहे. क्षमा मागितली तरीही पुरेसं आहे. मी राजीनामा द्या असं सांगत नाही. कायद्यानुसार त्यांची नोकरी तर जाणारच आहे.’
‘क्रूझवर एक आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफिया होता. त्याबाबत एनसीबीच्या मुथा साहेबांनी, ज्ञानेश्वर सिंह, समीर वानखेडे यांनी त्याच्याबाबत काय ते सांगावं की, दाढीवाला कोण आहे. कोणत्या देशाचा तो व्यक्ती आहे. त्याचं नागरिकत्व कोणत्या देशाचं आहे, किती प्रकरणं देशात त्याच्याविरोधात आहे?
जर ते डीजी आहेत त्यांना हे शोधावं लागेल. जर डीजी साहेबांनी हे समोर आणलं नाही, सीसीटीव्ही फुटेज तपासलं नाही तर आम्हाला वाटेल की, संपूर्ण डिपार्टमेंट या खेळात सहभागी असेल.’
‘मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. जे सर्टीफिकेट ट्विटरवर टाकलं आहे, निकाहनामा शेअर केलं आहे. जर ते चुकीचं निघालं तर मी राजकारणच सोडून देईन. मंत्रिपद सोडून देईन. त्यामुळे मी माझ्या भूमिकेवर ठाम राहणारच.’ असं नवाब मलिक यांनी थेट पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
समीर वानखेडे चारी बाजूने अडकले?, NCB टीमच्या आधी मुंबई पोलिसांनी सुरु केला ‘त्या डील’चा तपास
दरम्यान, आता नवाब मलिक यांच्या थेट राजकारण सोडून देण्याच्या वक्तव्यामुळे आता हे प्रकरण अधिकच तापू लागल्याचं दिसत आहे.
दुसरीकडे समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून असा दावा करण्यात येत आहे की, आपण कधीही धर्म बदलेला नाही. त्यामुळे त्यांचं जात प्रमाणपत्र खोटं असण्याचा प्रश्नच येत नाही.
ADVERTISEMENT