इंडिया टुडे आणि सी व्होटर्सने एक सर्व्हे ऑगस्ट महिन्यात केला होता. त्यानुसार लोकसभा निवडणूक आज झाली तर धक्कादायक चित्र हे एनडीएसाठी असेल असा निष्कर्ष यात काढण्यात आला होता. हा निष्कर्ष असा होता की लोकसभा निवडणूक आज झाली तर ती भाजपसाठी महाराष्ट्रात धक्कादायक चित्र दाखवणारी असेल.
ADVERTISEMENT
‘इंडिया टुडे’ आणि ‘सी-व्होटर्स’चा सर्व्हे काय?
इंडिया टुडे आणि सी व्होटर्सचा सर्व्हे हे सांगत होता की आज लोकसभा निवडणूक झाली तर आजही मोदीच हे देशाचे पंतप्रधान होतील. NDA ला २८६ च्या आसपास जागा मिळतील. तर UPA ला १४६ जागा मिळतील. मात्र हे झालं देशपातळीवर. महाराष्ट्रासाठीचे धक्कादायक निकाल या सर्व्हेतून समोर आले होते. लोकसभेच्या निवडणुका आज झाल्या तर महाराष्ट्रात NDA ला तर ४८ पैकी NDA ला अवघ्या १८ जागा मिळतील तर UPA ला ३० जागा मिळतील. हा सर्व्हे नेमका कसा काढला हे सीव्होटर्सचे संस्थापक यशवंत देशमुख यांनी सांगितलं आहे.
यशवंत देशमुख यांनी काय म्हटलं आहे?
“जो डेटा आम्ही काढला किंवा सर्व्हे आम्ही केला त्यामध्ये आश्चर्य आम्हाला फारसं वाटण्यासारखं काही नव्हतं. आमच्या सर्व्हेमध्ये जे निष्कर्ष काढले होते ते एका सर्व्हेवरून काढलेले नव्हते. रोज लोकांशी बोलून आम्ही हे सगळे निष्कर्ष काढले होते. ज्यावेळी हा सर्व्हे समोर आणला त्यावेळी महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झालं होतं”, असं यशवंत देशमुख यांनी स्पष्ट केलं.
“महाराष्ट्रात शिवसेना दुभंगली. त्यानंतर खरी शिवसेना कुणाची? हा वाद सुरू झाला. हा वाद अजूनही सुरू आहे. तर दुसरीकडे जेव्हा नवं सरकार राज्यात स्थापन झालं. म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी जे बंड केलं त्यानंतर त्यांचा गट भाजपसोबत जाईल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटलं होतं मात्र तसं झालं नाही. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. बिहारमध्ये नितीशकुमारांनी भाजपची साथ सोडली हे उदाहरणही ताजं होतं. त्या पार्श्वभूमीवर हा जो सर्व्हे आहे तो तयार झाला होता”, असं यशवंत देशमुख यांनी सर्व्हेबद्दल बोलताना सांगितलं.
“महाराष्ट्र आणि बिहारची तुलना केल्यास लोकांना कदाचित आवडणार नाही. पण मी फक्त उदाहरण म्हणून हे तुम्हाला सांगितलं. २०१९ ला भाजप शिवसेनेची युती होती. विधानसभेच्या वेळी या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार यावरून वाद झाला आणि युती तुटली. मात्र महाराष्ट्राच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांची आपली अशी एक व्होट बँक आहे. या पक्षांना मतदान करणारा हा वर्ग आहे”, असं यशवंत देशमुख यांनी सर्व्हेवर भाष्य करताना सांगितलं.
“आता प्रश्न हा आहे की शिवसेना दुभंगल्यानंतर शिवसेनेचा जो मतदार आहे तो एकनाथ शिंदेंसोबत जाणार की उद्धव ठाकरेंसोबत? तर यात परत दोन प्रकार पडतात. मुंबईतली शिवसेना हा एक वेगळा पक्ष म्हणून मतदार पाहतात. तर मुंबईबाहेरची शिवसेना या कडे पाहण्याचा मतदारांचा दृष्टीकोन आहे. आमच्या सर्व्हेतूनही हीच बाब समोर आली आहे. युतीचे जे मतदार होते त्यातले मुंबई बाहेरचे जे मतदार आहे त्यांची मतं भाजपच्या बाजूने कदाचित वळू शकतात. कारण ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तो मतदार मतं देणार नाही”, असं मत यशवंत देशमुख यांनी ‘मुंबई Tak’शी बोलताना मांडलं.
“मुंबईत शिवसेना ही ठाकरे कुटुंबाशी संबंधित म्हणून पाहिली जाते. त्यामुळे मुंबईबाहेरचा मतदार आणि मुंबईतला मतदार यांच्यात फरक आहे. शिवसेनेतली बहुतांश मतं मुंबई बाहेर शिंदे गटासोबत जातील तर मुंबईत ही मतं उद्धव ठाकरेंच्या बाजूने जाऊ शकतात”, असं यशवंत देशमुख म्हणाले.
यशवंत देशमुख यांनी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे ज्याचा परिणाम सर्व्हेवर दिसला
१) शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री न करण्याचं भाजपचं धक्कातंत्र याचा परिणाम सर्व्हेवर आहे.आता लोकांचं मत बदलतं का ते पाहावं लागेल. शिवसेनेचे मतदार आहेत त्यांचं भावनिक संबंध हा ठाकरे परिवारासोबत आहे.
२) देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केलं गेलं त्याचा जो झटका मतदारांना बसला त्याचा परिणाम सर्व्हेवर दिसून आला.
३) काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंना निवडणुकीत यश मिळवायचं असेल तर त्यांना पाच टक्के मतं स्वतः कडे खेचायची आहेत ज्याचा गंभीर परिणाम दिसू शकतो.
मात्र हे सगळे अंदाज आहेत. पुढच्या काही दिवसांमध्ये जेव्हा सरकार स्थिरस्थावर होईल. एकनाथ शिंदे जे साध्य करू पाहात आहेत ते जर का झालं तर हे चित्र कदाचित बदलेलंही दिसू शकतं.
ADVERTISEMENT