सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा परळीत आल्या असत्या त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तुल आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर करुणा शर्मा यांनी आपण परळीत पत्रकार परिषद घेणार असं जाहीर केलं होतं. १० वाजता करुणा शर्मा बीडमध्ये आल्या पण १२ वाजल्याची वेळ देऊनही त्या परळीत पोहचल्या नव्हत्या.
ADVERTISEMENT
यादरम्यान करुणा शर्मा यांच्या गाडीत पोलिसांना बेकायदेशीर पिस्तुल आढळल्यामुळे त्यांच्यावर धनंजय मुंडे आणि कुटुंबियांचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय स्थानिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
करुणा शर्मा यांची पत्रकार परिषद असल्यामुळे पोलिसांनी वैजनाथ मंदिर परिसरात अतिरीक्त बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करुणा शर्मा पत्रकार परिषदेसाठी आल्या असता विशाखा घाडगे आणि गुड्डी तांबोळी या दोन महिलांशी त्यांची बाचाबाची झाली. ज्यावरुन करुणा शर्मा या दोघींना म्हणाल्या की तुम्ही पैसे घेऊन येथे आल्या आहात. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली.
ज्यानंतर गुड्डी तांबोळी या महिलेला करुणा शर्मा यांनी चाकू मारल्यामुळे ती जखमी झाली. तिच्यावर आंबेजोगाई येथे उपचार सुरु आहेत. यावरुन विशाखा घाडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन करुणा शर्मा व अरुण मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान करुणा शर्मा यांच्या गाडीत सापडलेलं पिस्तुल नेमकं कुठून आलं याबद्दल अद्याप खुलासा झालेला नाहीये. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती करुणा शर्मा यांच्या गाडीत काहीतरी वस्तू ठेवत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळालेलं आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते धनंजय मुंडे व त्यांच्या कुटुंबियांचा घातपात करण्याचा करुणा शर्माचा डाव होता. यावरुन सध्या परळी पोलीस चौकशी करत असून करुणा शर्मांवर अटकेची कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. स्थानिक DYSP सुनील जायभाये या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
ADVERTISEMENT