नागपूर: कोरोनाचं (Corona) संकट एवढं भयंकर झालं आहे की, यातून नेमका मार्ग कसा काढायचा हेच सर्वांना उमजेनासं झालं आहे. पण अशा संकटाच्या वेळी देखील काही जण अक्षरश: देवदूतासारखे धावून येत आहेत. त्यामुळे अद्यापही माणुसकी शिल्लक असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच आता एका पोलीस अधिकाऱ्याने (Police Officer) मध्यरात्री एक असं काम केलं आहे की, त्यामुळे तब्बल 15 कोरोना रुग्णांचे जीव वाचले आहेत.
ADVERTISEMENT
त्याचं झालं असं की, नागपुरातील (Nagpur) जरीपटका परिसरातील नमुनाबाई तिरपुडे रुग्णालयातील व्यवस्थापनाने रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशन जरीपटका येथे पत्र दिले की, त्यांच्या हॉस्पिटलला ऑक्सिजन (Oxygen) सिलेंडरची तात्काळ आवश्यकता आहे. वेळीच पुरवठा झाला नाही तर 15 रुग्णांचे जीव धोक्यात येऊ शकतात. रुग्णालयाला नियमित होणाऱ्या पुरवठादारांकडून ऑक्सिजनचा पुरवठा होत नसून त्यांना दहा ऑक्सिजन सिलेंडरची तात्काळ आवश्यकता आहे.
धार्मिक स्थळांच्या माध्यमातून कोव्हिड रुग्णांची सेवा करणारे कोव्हिड योद्धे
रात्री एक वाजता तिरपुडे रुग्णालयाचे डॉ. शिवाजी सुपलकर हे स्वत: ऑक्सिजन सिलेंडर तात्काळ मिळावे यासाठीचे पत्र घेऊन पोहोचले. या घटनेचं गांभीर्य ओळखून जरीपटका पोलीस स्टेशन येथे रात्री कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक महादेव नाईकवाडे यांनी आपल्या चार सहकाऱ्यांसह जरीपटका परिसरातील ऑक्सिजन प्लांट येथे धाव घेतली.
ऑक्सिजन प्लांट येथे पोलीस अधिकारी गेले असता तेथील कर्मचाऱ्यांनी शासनाचा लिखित आदेश असल्याशिवाय आम्ही ऑक्सिजन सिलेंडर देऊ शकत नाही असे कळवले. परंतु रुग्णालयातील रुग्णांचे प्राण वाचवणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे होते. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक महादेव नाईकवाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सिलेंडर मिळावेत यासाठी विनंती केली.
केंद्र सरकारने वेळप्रसंगी कर्ज काढावं पण सर्वांचं लसीकरण करावं; नाना पटोले यांचं वक्तव्य
यावेळी ऑक्सिजन प्लांट मालकाने परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ सात सिलेंडर उपलब्ध करून दिले. ते ऑक्सिजन सिलेंडर तात्काळ तिरपुडे रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला देण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे तिरपुडे रुग्णालयात आयसीयूमध्ये पंधरा रुग्ण उपचार घेत होते. यावेळी ऑक्सिजनचा पुरवठा वेळीच झाल्यामुळे या पंधरा कोरोना रुग्णांचे प्राण वाचले.
तिरपुडे रुग्णालयाचे डॉ. शिवराज सुपलकर यांनी ‘मुंबई तक’शी फोनवर बोलताना पोलिसांचे आभार मानले. वेळीच रुग्णांना मदत मिळाल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच ऑक्सिजन, रेमडेसिवीर औषधे शासनाने तात्काळ उपलब्ध करून द्यावीत अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाचे पोलीस विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले असले तरी प्रसंगावधान राखून कोरोना रुग्णांचे प्राण वाचवणार्या नागपुरातील जरीपटका पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक महादेव नाईकवाडे यांनी केलेलं काम हे नक्कीच वाखाणण्याजोगं आहे. त्यामुळेच त्यांच्या या कार्याला ‘मुंबई तक’चाही सलाम.
ADVERTISEMENT