एका स्वयंघोषित महाराजावर आपल्या पत्नीचे प्रेमसंबंध आहेत अशी माहिती पतीला कळली. त्यावरून पती पत्नींमध्ये वाद होत, खटके उडत. महाराज आणि ती महिला या दोघांच्या अनैतिक संबंधांमध्ये पती अडसर ठरत होता. त्यामुळे पत्नीने महाराजाच्या मदतीने पतीची हत्या केली. या प्रकरणी या महिलेसह एकूण चौघांना अटक करण्यात आली आहे. आनंद गुलाबर गुजर (वय 43) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. प्रगती दर्शन, स्पाईन रोड, शिवाजी नगर या ठिकाणी तो राहात होता. या हत्येप्रकरणी त्याची आनंदची पत्नी सरोज गुजर, रमेश कुंभार, योगेश निकम आणि अनिकेत उर्फ रामदास बडदम या चार जणांना अटक करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज घाटात शनिवारी एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार घटनास्थळी पाहणी केल्यावर, तिथे एक दुचाकी आढळून आली. त्या दुचाकीच्या नंबरवरून आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो नंबर बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर चेसी क्रमांकावरून ही दुचाकी मयत आनंद गुलाब गुजर यांची असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेचा तपास सुरू असताना. आम्हाला माहिती मिळाली की, मयत आनंद याच्या पत्नीचे मठाधिपती रमेश विलास कुंभार याच्यासोबत अनैतिक संबंध होते.
याबाबत पतीला माहिती झाली होती. यावरून दोघांमध्ये सतत वाद झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पत्नी सरोज ही महाराज रमेश याच्यासोबत राहत होती. तर पती आनंद हा महाराजाच्या मठात गेला. तेव्हा पत्नी आणि महाराजासोबत त्याचा वाद झाला. त्यामध्ये तेथील महाराज, पत्नी सरोज आणि इतर दोघांनी आनंद याला मारहाण केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर चौघांनी आनंदाचा मृतदेह कात्रज घाटात आणून टाकला आणि त्याची दुचाकी मृतदेहाच्या बाजूला लावून निघून गेले. आनंद याचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करण्याचा प्लॅन त्यांचा होता. पण यांचा बनाव काही तासात उघड करण्यास यश आल्याचे भारती विद्यापीठ पोलिसांनी सांगितले असून चौघांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातली ही अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकरासाठी पत्नीने तिच्या पतीला संपवलं आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी या सगळ्यांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT