सिंधुदुर्ग: ‘मंत्रिपदाचा वापर राणेंनी देशाच्या विकासासाठी करावा. नाही तर इतर मंत्र्यांची जशी गच्छंती झाली तशीच गच्छंती व्हायला वेळ लागणार आहे.’ अशी खरमरीत टीका शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार आणि नारायण राणे यांचे कोकणातील कट्टर प्रतिस्पर्धी दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
नारायण राणे (Narayan Rane) यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर शिवसेनेत काहीसं अस्वस्थतेचं वातावरण असल्याची चर्चा आहे. याच वेळी शिवसेनेचे आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणेंवर बरीच टीका केली आहे.
पाहा दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले:
‘नारायण राणे शिवसेनेवर जी आगपाखड करतात त्यामुळे त्यांना केंद्रांमध्ये मंत्रिपद मिळालेलं आहे. या मंत्रिपदाचा वापर त्यांनी महाराष्ट्रासह भारतातल्या जनतेसाठी करावा.’
‘देशभर भ्रमंती करून देशाचा विकास करण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा इतर मंत्र्यांची जशी गच्छंती झाली तशीच गच्छंती व्हायला वेळ लागणार नाही.’ अशी टीका आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे.
दरम्यान, दीपक केसरकर यांच्यासोबत संजय राऊत यांनी देखील नारायण राणे यांच्यावर खास आपल्या शैलीत निशाणा साधला आहे.
‘शिवसेनेला फटका बसण्यासाठी राणेंना मंत्रिपद दिलं असेल तर तो मोदींच्या कॅबिनेटचा अपमान आहे. लघू, स्क्षूम आणि मध्यम या खात्याचं मंत्रिपद त्यांना देण्यात आलं आहे. खरं म्हणजे त्यांना जे मंत्रिपद देण्यात आलं आहे त्यापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. अनेक पदं त्यांनी सांभाळली आहे.’
‘भाजपने खरं म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आभार मानले पाहिजेत की, आमच्याकडून जो पुरवठा त्यांना झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात चेहरे मिळाले आहेत.’
‘कपिल पाटील, भारती पवार हे पूर्णपणे राष्ट्रवादीचं प्रोडक्ट आहे. नारायण राणे हे शिवसेना, काँग्रेस करत भाजपमध्ये गेलेले आहेत. हे पाहिल्यावर असं दिसेल की, मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा हा शिवसेना आणि राष्ट्रवादीचाच आहे.’ असं संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत.
Cabinet Expansion : राणेंची राजकीय उंची त्यापेक्षाही मोठी, लघु-सूक्ष्म मंत्रालयावरुन शिवसेनेचा टोला
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी पार पडला असून यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला 4 मंत्रीपद आली आहेत. भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळालेल्या नारायण राणे यांना मोदींच्या कॅबिनेटमध्ये लघु-सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचं कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे.
दरम्यान, कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने राणेंना मंत्रिपद दिल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे आगामी काळात शिवसेना विरुद्ध राणे असा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT