मुंबई: अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर 2 नोव्हेंबर रोजी अभिनेता सूर्याचा तामिळ लीगल ड्रामा ‘जय भीम’ हा आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित या चित्रपटात दिग्गज अभिनेता प्रकाश राज याने एक महत्त्वाची भूमिका साकारली आहे. पण आता याच चित्रपटातील एका सीनवरून बराच गदारोळ सुरु झाला आहे.
ADVERTISEMENT
एका सीनमध्ये प्रकाश राज हा हिंदी बोलणाऱ्या व्यक्तीला थेट कानशिलात लगावतो आणि त्याला तामिळमध्ये बोल असं सांगतो. दरम्यान, हाच सीन आता सोशल मीडियावर व्हायरल होता आहे आणि अनेकांनी या सीनवर आक्षेप घेतला आहे.
‘या’ सीनवरून वाद, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
‘जय भीम’ सिनेमातील एका सीनमध्ये एक माणूस हा हिंदीत बोलत असताना प्रकाश राज त्याला जोरदार कानशिलात लगावतो. त्यावेळी तो व्यक्ती त्याला विचारतो की, तुम्हा मला कानशिलात का मारली? यावेळी उत्तर देताना प्रकाश राज त्याला म्हणतो की,- ‘तामिळमध्ये बोला.’ दरम्यान, याच सिनवरुन चित्रपट समीक्षक रोहित जसवाल यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. हा सीन पाहून आपल्याला कसं वाईट वाटलं हे त्यांनी ट्विटरवरुन सांगितलं आहे.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘आम्ही तामिळ चित्रपटांची वाट पाहतो. आम्ही त्यांना पाठिंबा देतो. आम्ही निर्मात्यांना संपूर्ण भारतात हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे आवाहन करतो. त्या मोबदल्यात आम्हाला प्रेमाशिवाय काहीही नको असते. पण हा चित्रपट पाहिल्यानंतर मला अतिशय वाईट वाटलं. अभिनेता किंवा कोणाच्याही विरोधात काहीही चुकीचं वाटल नाही. पण अशा सीनची गरज नव्हती. निर्माते तो सीन काढून टाकतील अशी आशा आहे.’
‘जय भीम’ या चित्रपटाला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि अभिनेते कमल हासन यांनी चित्रपटाचे आणि स्टारकास्ट आणि क्रूचे कौतुक केले आहे. सूर्याचा उत्कृष्ट अभिनय लोकांची मने जिंकत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच चर्चेत आला आहे.
‘जय भीम’ हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि हिंदीमध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट 1993 च्या सत्य घटनेवर आधारित आहे जिथे न्यायमूर्ती के चंद्रू यांनी अशीच एक केस लढवली होती.
ADVERTISEMENT