नारायण राणे यांच्या अटकेमागे शिवसेनेचं षडयंत्र आहे असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. नारायण राणे यांना अटक करण्यासंबंधीचे आदेश पालकमंत्री अनिल परब देत होते. त्यांनी हे आदेश मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून दिले आहेत हे उघड आहे. खरंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आहेत मात्र त्यांनी यासंदर्भातले आदेश दिले नाहीत. पोलीस अधीक्षकांना परब यांनी कारवाई करायला लावली. जन आशीर्वाद यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळे शिवसेनेने षडयंत्र रचलं असंही दरेकर यांनी म्हटलंय.
ADVERTISEMENT
महाडच्या केसचा निकाल लागला तर नाशिकच्या केसमध्ये अनुषंगाने ताब्यात देण्याचं षडयंत्र यामागे असलं पाहिजे असंही दरेकर यांनी म्हटलं आहे. मात्र काहीही झालं तरीही जन आशीर्वाद यात्रा थांबणार नाही आम्ही ती यात्रा पूर्ण करू असंही दरेकर यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी चर्चा केली. नारायण राणे यांना न्याय मिळावा म्हणून महाड कोर्टात दाद मागणार आहोत. न्यायालयात काय होतं आहे ते पाहू. नारायण राणेंच्या प्रकृतीच्या संदर्भात काय म्हणणं आहे ते पाहू. त्यानंतर वरिष्ठांशी चर्चा करू आणि निर्णय घेऊ असंही दरेकर यांनी म्हटलं आहे. भाजपच्या सगळ्या जन आशीर्वाद यात्रा ताकदीने सुरू आहेत. त्यामुळेच राणेंना अडकवण्याचा हा राज्य सरकारचा डाव आहे असंही दरेकरांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले नारायण राणे?
‘मी असं म्हटलं होतं की स्वातंत्र्य दिनी जर त्यांना हे माहित नाही की देशाचा हिरक महोत्सव आहे की अमृत महोत्सव आहे तर त्यादिवशी जर मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती. राष्ट्राला जे स्वातंत्र्य मिळालं त्याला किती वर्षे झाली हे मुख्यमंत्र्यांना माहिती नाही म्हणून मी हे वक्तव्य केलं होतं. आता बळाचा वापर करून मला अटक करण्यात आली आहे. जबरदस्ती अटक करण्यात आली आहे. काही कारण नसताना माझ्या जिवितास धोका निर्माण होईल असं वर्तन पोलीस करत आहेत. चार FIR माझ्याविरोधात दाखल करण्यात आल्या आहेत, 100 केल्या तरीही हरकत नाही. त्यांच्या हातात कायदा आहे.
मुख्यमंत्र्यांचा मुलगा जेव्हा सुशांत आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणात अडकला तेव्हा त्याला कसं वाचवलं? असाही प्रश्न नारायण राणेंनी विचारला. आता तुमच्या अटकेनंतर केंद्र आणि राज्य यांच्यात संघर्ष सुरू होईल का? असं विचारलं असता राणे म्हणाले, राज्य आमच्याशी संघर्ष करूच शकत नाही. माझी अटक असंवैधानिक आहे असंही नारायण राणे म्हणाले. कायद्याचा जो काही गैरवापर होतो आहे ते मी पाहतो आहे, जे कुणी यामध्ये गुंतले आहेत त्यांच्यावर मी कारवाई करणार आहे असंही राणेंनी मुंबई तकला सांगितलं आहे.
ADVERTISEMENT