जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना आणि त्यामार्फत करण्यात आलेले व्यवहार म्हणजे हिमनगाचं टोक आहे. यादी अजून बरीच मोठी आहे असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या सहकारी साखर कारखान्यांना तोट्यात दाखवायचं. राज्य सहकारी बँकेने कारखाना जप्त करून तो लिलावात काढायचा. लिलाव करताना 200 ते 400 कोटींची मालमत्ता 15 ते 20 कोटींना विकायचा. मी यासंदर्भात आता अमित शाह यांनाही पत्र लिहिणार आहे. की लिलावात घेतल्या गेलेल्या सगळ्या कारखान्यांची चौकशी लावा. 200 कोटींची मालमत्ता असलेला साखर कारखाना पंधरा कोटींना विकला कसा जातो?
ADVERTISEMENT
आधी हे सगळं करायचं मग त्याच कारखान्यावर 300 कोटींचं बँक लोन घ्यायचं. ज्या कारखान्याची किंमत 15 कोटी ठरवली त्या बँकेला पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने 300 कोटींचं कर्ज कसं दिलं? त्यामुळे जरंडेश्वर हे हिमनगाचं टोक आहे. मोठी यादी आहे, काही काळजी करू नका ही सगळी यादी बाहेर येणार आहे. मी कुणालाही धमकी देत नाही. माझ्या बोलण्यात कधीही धमकी नसते. मात्र जो खेळखंडोबा काय चालला आहे? त्याचं उत्तर जनतेला हवं आहे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
ईडीने जी जप्तीची कारवाई केली त्यानंतर सगळ्याच गोष्टी समोर आल्या. हा कारखाना कुणाचा? तर शालिनीताई पाटील यांचा. तो तोट्यात कसा दाखवला गेला? त्याचा लिलाव कसा झाला? लिलावात तो कोणत्या कंपनीने घेतला? त्याचे संचालक कोण? या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या आहेत. हा साखर कारखाना 65 कोटींची मालमत्ता आहे. मात्र जरंडेश्वर पुरता हा विषय मर्यादित नाही. राज्य सहकारी बँकेने जे कारखाने मातीमोल किंमतीने विकले त्या सगळ्यांचा विषय आहे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. त्यामुळे आता अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या अडणींमध्ये भर पडणार का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
या साखर कारखान्यावर 2010 मध्ये 78 कोटी 90 लाखांच्या थकीत कर्जापोटी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जप्ती आणली होती. त्यानंतर हा कारखाना अजित पवार यांचे मावस भावाच्या कंपनीने लिलावात घेतला. माजी आमदार आणि महसूल मंत्री शालिनीताई पाटील या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संस्थापिका आणि चेअरमनही होत्या. 16 जुलै 2010 हा कारखाना बँकेकडून लिलावात काढण्यात आला. साखर कारखान्याचा लिलाव झाल्यानंतर अजित पवार यांचे मावस भाऊ राजेंद्रकुमार घाडगे यांच्या कंपनीने हा कारखाना विकत घेतला. ज्यानंतर हा लिलाव हेतूपुरस्सर झाल्याचा आरोप करण्यात आला होता. ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल एक कोटीहून कमी होती त्या कंपनीने 60 कोटींपेक्षा जास्त किंमत असलेला कारखाना कसा विकत घेतला? हा प्रश्न निर्माण झाला. या प्रकरणी आता चंदक्रांत पाटील यांनी सूचक अशी प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT