Jayant Patil :”एकनाथ शिंदे दोन-चार महिन्यांनी नितीश कुमारांसारखं करू शकतात, कारण…”

मुंबई तक

• 12:50 PM • 11 Aug 2022

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राजकीय उलथापालथीचं उदाहरण देत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं. हे विधान करताना जयंत पाटलांनी पार्श्वभूमीही मांडली. दुसरीकडे शिवसेनेच्या चिन्हाशिवाय निवडणुका लढवण्याची उद्धव ठाकरेंची तयारी असून, त्यांना सोबत घेऊ, असं अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली. ‘शिंदे गटात गेलेल्या शिवसेना आमदार, खासदारांना निवडून आणण्याची जबाबदारी एकनाथ […]

Mumbaitak
follow google news

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राजकीय उलथापालथीचं उदाहरण देत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं. हे विधान करताना जयंत पाटलांनी पार्श्वभूमीही मांडली. दुसरीकडे शिवसेनेच्या चिन्हाशिवाय निवडणुका लढवण्याची उद्धव ठाकरेंची तयारी असून, त्यांना सोबत घेऊ, असं अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली.

हे वाचलं का?

‘शिंदे गटात गेलेल्या शिवसेना आमदार, खासदारांना निवडून आणण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेबरोबर देवेंद्र फडणवीसांनीही घेतलीये. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगातील सुनावणी लांबण्याची चिन्हं दिसत आहेत. त्यामुळे असं दिसतंय की, शिंदेकडून शिवसेनेवर दावा करण्याचे प्रयत्न होताहेत. उद्धव ठाकरेंना चिन्हं मिळालं नाही, तर त्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका असणार आहे का?’, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी (जयंत पाटील) सविस्तर भाष्य केलं.

उद्धव ठाकरेंना चिन्हा चिंता नाही, असं मला वाटतंय; जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

जयंत पाटील म्हणाले, “मी काही शिवसेनेचा प्रवक्ता नाहीये, पण मला असं दिसतंय की उद्धव ठाकरेंची ती तयारी आहे. शिवसेनेचं चिन्हं त्यांच्याकडे राहिल असा त्यांचा आशावाद असावा, पण चिन्हापेक्षा आता काँग्रेसने किती वेळा चिन्ह बदललं. पूर्वी बैलजोडी होती. मग गायवासरू आलं. आता हात आला. पूर्वी तर काही यंत्रणा नसताना चिन्हांचा प्रसार झाला. आता दोन सेकंदात नवं चिन्ह महाराष्ट्राला आणि देशाला कळतं.”

उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील, तो निवडून येईल; ‘मातोश्री’वरील भेटीनंतर जयंत पाटलांचं विधान

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, “चिन्हाची चिंता उद्धव ठाकरेंना आहे, असं मला वाटतं नाही. ज्याच्याकडे प्रतिमा आहे, ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे आणि जो लोकांच्यात जाण्याची तयारी ठेवून आहे. त्याच्यावर चिन्हाचा परिणाम होतो, असं मला वाटतं नाही. चिन्ह गोठवलं, तर नवीन चिन्ह घेतील. लोकांपर्यंत नवं चिन्ह जाण्यासाठी किती वेळ लागतो. मला त्याची चिंता वाटत नाही.”

आम्हाला शिवसेनेची साथ असेल -जयंत पाटील

“राष्ट्रवादी काँग्रेसची विरोधी पक्ष म्हणून बसायची तयारी झालेली आहे. आमचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आम्ही सर्वजण लोकांचे प्रश्न धडाडीने मांडू. सत्तेत असल्यावरच पक्ष वाढतो, असं नाही. तर विरोधात असताना पक्ष वाढवता येतो. त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्याचे प्रयत्न करू. त्यासाठी आम्हाला काँग्रेसची साथ आहे. त्याचबरोबर अधिकृत शिवसेनेची साथ असेल. आम्ही तिन्ही पक्ष मिळून या सरकारच्या चुकांवर बोट ठेवण्याचं काम करू”, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे आणि चिराग पासवान होण्यापासून कसे वाचले नितीश कुमार?, बिहारच्या राजकारणाची इनसाइड स्टोरी

जयंत पाटील : “भाजप-एकनाथ शिंदे यांचं किती जमणार? नितीश कुमारांसारखा रिव्हर्स गिअर टाकू शकतात”

“महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले जे आमदार आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तर काय हा खरा प्रश्न आहे. जर पूर्ण झाल्या नाही, तर मला फारसं आश्चर्य वाटणार नाही की, दोन-चार महिन्यांनी नितीश कुमारांसारखं एकनाथ शिंदेंनी रिव्हर्स गिअर टाकला, तर? ते करू शकतात. कारण एकनाथ शिंदे काहीही करू शकतात आपण हे पाहिलं आहे. त्यामुळे भाजप-एकनाथ शिंदे यांचं किती जमणार? एकनाथ शिंदेंनी ज्या मंत्र्यांना बरोबर घेतलंय, ते भाजपला मान्य आहे का? भाजपचे नेते एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांविरोधात आताच जाहीर विरोधी भूमिका घ्यायला लागले आहेत. त्यामुळे ही सर्कस किती काळ चालणार, हा खरा प्रश्न आहे. पण लोकांसमोर जाण्यासाठी जी नैतिकता लागते, ती शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे”, अशी भूमिका जंयत पाटील यांनी यावेळी मांडली.

    follow whatsapp