मुंबईच्या दहीसर पूर्व भागातील गावडे नगर परिसरात एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे. परंतू यावेळी चोरट्यांना विरोध करणाऱ्या दुकानदाराला आपले प्राण गमवावे लागले आहेत. विकास पांडे असं दुकानदाराचं नाव आहे.
ADVERTISEMENT
दहीसर पूर्व भागातील रावळपाडा भागात विकास पांडे यांचं ॐ साई ज्वेलर्स नावाचं दुकान आहे. आज सकाळी १० वाजल्याच्या सुमारास तीन चोरटे गाडीवरुन पांडे यांच्या दुकानात शिरले. यावेळी दुकानातला माल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना पांडे यांनी विरोध केला. परंतू या झटापटीत चोरट्यांनी पांडे यांची गोळी मारुन हत्या करत त्या भागातून पोबारा केला. यात Active चालवत असलेल्या आरोपीने पांढऱ्या रंगाचा कुर्ता, तर इतर आरोपींनी पूर्ण बाह्यांचा शर्ट घातला होता. आरोपींनी आपल्या गाडीची नंबर प्लेट वाकवून ठेवली होती.
पोलीस सध्या या आरोपीचा शोध घेत असून त्यांनी दहीसर चेक नाका क्रॉस केल्याचं सीसीटीव्हीवरुन स्पष्ट झालंय.
दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच पांडे यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केलं. परंतू डोक्यात गोळी लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झालेला होता. पांडे यांची कोणाशीही वैर नव्हतं त्यामुळे त्यांची हत्या झाल्यामुळे परिवारातील सर्वांना धक्का बसला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर येऊन तपासाला सुरुवात केली आहे. मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी विश्वास नांगरे-पाटील, दिलीप सावंत, झोन-१२ चे डीसीपी डॉ. स्वामी यांनी घटनास्थळी जाऊन तपासकार्याचा आढावा घेतला. बाईकवरुन पळून जात असताना तिन्ही आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत. परंतू दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे दहीसरमध्ये तणावाचं वातावरण आहे.
ADVERTISEMENT