करूणा शर्मा यांना अंबाजोगाई सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर त्यांच्यासोबत असलेल्या चालकाला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. यानंतर करूणा शर्मा मुंडे यांना आरोग्य तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात पाठवण्यात आलं असून त्यानंतर त्यांची बीड येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली जाणार आहे. ड्रायव्हर मोर यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
करूणा शर्मा यांच्यातर्फे कुणी वकील नव्हता. त्यामुळे त्यांनी स्वतःच न्यायालयात त्यांची बाजू मांडली. जज एस. एस. सापटेनकर यांनी करूणा शर्मा यांचं म्हणणं ऐकून घेतलं. मला खोट्या गुन्ह्यात अटक झाल्याचं करूणा शर्मा यांनी सांगितलं. ज्यानंतर करूणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. करूणा शर्मा यांचे वकील उद्या कोर्टात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती स्थानिक वकील एस. एम. गलांडे यांनी दिली.
धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा रविवारी परळीमध्ये होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तुल आढळून आलं. हे पिस्तुल बेकायदेशीररित्या बाळगल्याचं समोर आलं. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात करुणा शर्मा यांच्यावर तक्रार दाखल झालेली असतानाच आता नवीन माहिती समोर आली आहे. करुणा शर्मा यांची परळीतील पत्रकार परिषद घेण्यापूर्वीची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये करूणा शर्मा एका व्यक्तीशी बोलत आहेत. तो व्यक्ती पत्रकार परिषद घेण्यावरून करुणा शर्मा यांना सावध करण्याचा प्रयत्न करत आहे. पत्रकार परिषद घेऊन काही आरोप केले, तर न्यायालयाचा अवमान होईल, असं समोरचा व्यक्ती करुणा शर्मांशी बोलत आहे.
करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तुलही सापडलं. हे पिस्तुल नेमकं कुठून आलं याबद्दल अद्याप खुलासा झालेला नाहीये. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती करुणा शर्मा यांच्या गाडीत काहीतरी वस्तू ठेवत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळालं. त्यातच आता करूणा शर्मा यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
ADVERTISEMENT