करूणा शर्मा बीडमध्ये आल्या आणि त्यांच्या कारमध्ये बंदुक सापडल्या प्रकरणी त्यांना अटक झाली. करूणा शर्मा यांनी बीडमध्ये घेतलेली एंट्री आणि लगोलग त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे यातून काही गूढ प्रश्न निर्माण झाले आहेत. पहिला प्रश्न आहे तो हा की पिस्तुल त्या सोबत घेऊन आल्या होत्या की ते त्यांच्या कारमध्ये कुणी ठेवलं?
ADVERTISEMENT
करुणा धनंजय मुंडे परळीत पोचल्या आणि पत्रकार परिषदेच्या ठिकाणीच गदारोळ, गोंधळ झाला. या प्रकरणात करूणा यांच्याविरोधात काही लोकांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप केला. पोलिसांनी तक्रार येताच लगोलग करुणांविरोधात अट्रॉसिटीचा गुन्हाही नोंदवला. यातूनच पहिला गुढ आणि गंभीर प्रश्न निर्माण झालाय.
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, करुणा शर्मा उर्फ करुणा धनंजय मुंडे या क्वचितच परळीला आल्यात. काही लोकांच्या मते तर करुणा यांनी आपल्या उभ्या आयुष्यात परळीचं तोंड बघितलं नाही. मग परराज्यात मूळ असलेल्या करुणा यांना जातीचं नाव घेऊन शिव्या द्यायला परळीच्या लोकांच्या जाती कुठून माहीत झाल्या? एरवी अट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिस टाळाटाळ करत असल्याचं अनेकदा पहायला मिळतं. पण या प्रकरणात पोलिसांनी या अतिसक्रियतेचा अर्थ काय? करुणा शर्मा म्हणतात तसं यामागे राजकीय दबाव आहे का? याचा शोध घेतला पाहिजे. पण हा शोध कोण घेणार? कारण या प्रश्नांचा शोध घेण्यासाठीही नवा तपास सुरू करावा लागेल, असंच नाट्यमय, खळबळजनक या प्रकरणात घडताना दिसतंय मात्र हे प्रश्न निर्माण होत आहेत हे नाकारता येणार नाही.
करूणा मुंडे ज्या कारने प्रवास करत होत्या त्या स्कॉर्पिओमध्ये सापडलेलं पिस्तूल कोणाचं? डिक्कीत सापडलेलं हे पिस्तूल आधीच कारमध्ये होतं की ते ठेवण्यात आलं? हा या प्रकरणातला दुसरा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही याच प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची अपेक्षा व्यक्त केलीय. कारण व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तोंड झाकलेली महिला, ती महिलाच आहे की पुरूष हेही अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तर ही व्यक्ती डिक्कीत काहीतरी ठेवताना दिसते. आणि महत्त्वाचं म्हणजे ही व्यक्ती डिक्कीत काहीतरी ठेवत असताना तिच्या बाजूला एक पोलिस अधिकारीही असल्याचं दिसतंय.
विशेष म्हणजे या व्यक्तीने अगदी ओळखू येऊ नये यासाठी संपूर्ण चेहरा स्कार्फने झाकलेला आहे. डोळ्यावर गॉगल चढवलेला आहे. करुणा शर्मांच्या इनोव्हा मागे पोलिसांची कार दिसते. तिथेच एक पोलीस अधिकारी आणि महिला पोलीसही दिसतेय. त्यांच्यासमोर इनोव्हाची डिक्की उघडली जाते. त्यात काही तरी ठेवलं जातं. नंतर डिकी पुन्हा बंद केली जाते.
याच पार्श्वभूमीवर डिकीत गावठी पिस्तूल ठेवण्यात आल्याचा आरोप होतोय. पोलिसांनी जेव्हा डिकी उघडली तेव्हा ते कॅमेरा वगैरे घेऊन तैनात होते. म्हणजे पोलिसांनी घातपाताचा संशय होता. तर मग करुणा मुंडे यांच्याभोवती एवढी मोठी गर्दी जमेपर्यंत ते काय करत होते? याचं उत्तर पोलिस प्रशासन देणार का? करूणा शर्मा प्रकरण सध्या गाजतं आहेच मात्र तरीही निर्माण होणारे हे प्रश्नही तेवढेच महत्त्वाचे आहेत हे नाकारता येणार नाही.
ADVERTISEMENT